अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 21:13 IST2026-05-08T21:05:04+5:302026-05-08T21:13:41+5:30
Amit Shah West Bengal Visit: अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथे नवनिर्वाचित आमदारांना संबोधित करताना भाजपाचा पुढील प्लान सांगितला.

Amit Shah West Bengal Visit: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर आता सत्ता स्थापन करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथे जाऊन नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली.

या बैठकीत सर्व नवीन आमदारांना संबोधित करताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाची वाटचाल ३ जागांवरून आता २०० हून अधिक जागांपर्यंत कशी पोहोचली, हे आवर्जून सांगितले. पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानताना काही महत्त्वाची वचने दिली. हे शब्द भाजपा पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येभाजपाचे सरकार आले आहे. आता सीमा सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल. तस्करी आणि घुसखोरीवर कठोर कारवाई केली जाईल. घुसखोरांना हाकलून देशाला 'घुसखोरमुक्त' करण्याचे भाजपाचे वचन आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

ज्या परिस्थितीत निवडणुका झाल्या, ते पाहता जनतेने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखला. प्रचंड जनादेश दिला. कम्युनिस्ट राजवटीपासून भीती आणि हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले, ते अधिकच वाढत गेले. तरीही जनतेने भाजपाला पाठिंबा दिला. भाजपा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल आणि 'सोनार बांगला'च्या ध्येयाने पुढे वाटचाल करेल, असा शब्द अमित शाह यांनी दिला.

आता बंगालमध्ये भीतीमुक्त समाजाच्या दिशेने मार्ग मोकळा झाला असून जनतेने बदलाचा स्पष्ट संकेत दिला आहे. बंगालने कायदा व सुव्यवस्था, लोकशाही आणि अर्थव्यवस्था या बाबतीत नकारात्मक राजकारणाचा काळ अनुभवला आहे. पंतप्रधान मोदींनी बंगालच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आता भाजपाची आहे, असे अमित शाह यांनी आवर्जून सांगितले.

पश्चिम बंगालची संस्कृती आणि परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे काम भाजपा करेल आणि रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, अरविंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या संकल्पनेतील बंगाल घडवण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकास आणि जनसमर्थन दोन्ही मजबूत केले असून, हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे. पश्चिम बंगालमधील विजय केवळ भाजपाच्या विस्तारापुरता मर्यादित नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाशीही संबंधित आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

भाजपाने केवळ आपल्या संघटनेचा विस्तारच केला नाही, तर आपली विचारधाराही अधिक मजबूत केली. प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी काम केले आहे. पक्षाने असे चेहरे पुढे आणले जे शोषण आणि संघर्षाचे प्रतीक बनले. २०१४ मध्ये सुरू झालेला भाजपाचा प्रवास आता गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत पोहोचला आहे, असे अमित शाह यांनी नमूद केले.

अमित शाह यांनी यावेळी भाजपाच्या ३२१ हुतात्म्यांचे स्मरण केले. हा प्रवास सोपा नव्हता. या विजयासाठी ३२१ भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. संपूर्ण देशातील राजकारण पाहिले आहे. पण पश्चिम बंगाल आणि केरळ येथे झालेला हिंसाचार कधीही पाहिला नाही. कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.

१९५० मध्ये सुरू झालेला वैचारिक प्रवास आज बंगालमध्ये पोहोचला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमि असलेल्या बंगालमध्ये त्यांच्या वैचारिक पक्षाचे सरकार स्थापन होणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जेव्हा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले, तेव्हा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी म्हटले होते की, अजूनही एका गोष्टीची उणीव आहे, ती म्हणजे बंगालमधील भाजपा सरकार. आज ते स्वप्नही साकार होताना दिसत आहे, असे अमित शाह म्हणाले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे आणि ममता बॅनर्जी यांना पराभवाचा धक्का देणारे भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. कधीकाळी ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अधिकारी, हे आज भाजपाचे बंगालमधील सर्वांत मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत.

तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षाला बंगालमध्ये एक मजबूत स्थान मिळवून दिले. नंदीग्राममधील त्यांच्या ऐतिहासिक विजयाने त्यांची 'जायंट किलर' म्हणून ओळख निर्माण झाली. ते सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

















