Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:49 IST2026-05-07T17:48:48+5:302026-05-07T17:49:22+5:30
Mumbai Watermelon Death Case Update: मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. कलिंगड किंवा बिर्याणी नाही तर उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
मुंबईतील पायधुनी भागात २६ एप्रिल रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. कलिंगड किंवा बिर्याणी नाही तर उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधात असलेल्या झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत.
तब्बल ११ दिवसांनी डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं कारण अखेर स्पष्ट झालं आहे. २६ तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बिर्याणीनंतर चौघांनी रात्री कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता खरं कारण समोर आलं आहे.
कुटुंबीयांनी कोणत्याही कटाची शक्यता फेटाळून लावली आहे. घटनेनंतर तपास वेगाने सुरू असून फॉरेन्सिक टीमसह पोलीस प्रत्येक गोष्टीची कसून कशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात 'डेथ ऑडिट' देखील सुरू करण्यात आलं आहे. या ऑडिटद्वारे उपचारात काही हलगर्जीपणा झाला होता का, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की, रुग्णांवर मेडिकल प्रोटोकॉलनुसारच उपचार करण्यात आले होते. डॉक्टरांची एक समिती या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांच्या रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे. गरज पडल्यास तज्ज्ञांचं मतही घेतले जाईल. तसेच, जे. जे. रुग्णालयात या चौघांचे डेथ ऑडिट सुरू झाले आहे. यातून उपचारात झालेला विलंब किंवा हलगर्जीपणा समोर येईल. याआधीच्या एका रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी फूड पॉयझनिंगची शक्यता फेटाळून लावली होती.