'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:08 IST2026-05-08T13:06:30+5:302026-05-08T13:08:06+5:30
Hantavirus Indian News: Oceanwide Expeditions च्या क्रूझ शिपवर हंटाव्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. ३ डच आणि जर्मन नागरिकांचा मृत्यू. जहाजावर २ भारतीय कर्मचारी अडकले.

'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
अटलांटिक महासागरातील केप वर्डे बेटांजवळ एका लक्झरी क्रूझ शिपवर 'हंताव्हायरस'चा (Hantavirus) उद्रेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या जहाजावर एकूण ५ जणांना या विषाणूची लागण झाली असून, आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या जहाजावरील क्रू सदस्यांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश असल्याने चिंता वाढली आहे.
Oceanwide Expeditions कंपनीचे हे जहाज १ एप्रिल रोजी अर्जेंटिनाच्या उशुआइया येथून निघाले होते. १० मे रोजी ते स्पेनच्या कॅनरी आयलंडला पोहोचणे अपेक्षित आहे. जहाजावर २८ देशांतील एकूण १५० प्रवासी आणि क्रू सदस्य होते. मात्र, प्रवासादरम्यान प्रवाशांना हंताव्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
मृत्यूमुखी पडलेले प्रवासी
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक ६९ वर्षीय डच महिला, सदर महिलेचा डच पती व एक जर्मन महिला यांचा समावेश आहे.
भारतासाठी चिंतेची बाब
या क्रूझवर २८ वेगवेगळ्या देशांतील नागरिक असून, त्यात २ भारतीय क्रू सदस्यांचा समावेश आहे. सध्या हे सर्व सदस्य जहाजावरच असून त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाही. जहाजावरील ३८ लोक फिलीपीन्सचे, ३१ ब्रिटनचे आणि २३ अमेरिकेचे आहेत.
हा 'कोविड'सारखा धोका आहे का?
WHO च्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी स्पष्ट केले आहे की, ही कोणत्याही महामारीची सुरुवात नाही. हंताव्हायरस हा कोविड-१९ प्रमाणे वेगाने हवेतून पसरत नाही, तर तो जवळच्या आणि थेट संपर्कामुळे पसरतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसले तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे.