"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:38 IST2026-05-08T12:37:52+5:302026-05-08T12:38:28+5:30
"कॉर्पोरेट जिहादचा मास्टरमाइंड संभाजीनगरमध्येच!" निदा खानच्या अटकेनंतर संजय शिरसाटांचा एमआयएमवर थेट हल्ला

"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला अखेर नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतून अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली आहे. "निदा खानला एमआयएमने सहकार्य केले असून, तिला लपवून ठेवण्यात जलील यांचा हात आहे," असा खळबळजनक आरोप शिरसाट यांनी केला आहे.
"हे एक मोठं षडयंत्र"
संजय शिरसाट म्हणाले की, "निदा खान ही केवळ एक मोहरा असून याचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. धर्मांतर करणे आणि मुलींना फसवणे हे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान इतर कुठेही न जाता केवळ छत्रपती संभाजीनगरलाच का आली? कारण याचे मास्टरमाइंड इथेच आहेत. नारेगावसारख्या संवेदनशील भागात तिला आश्रय दिला गेला, जिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात."
इम्तियाज जलील यांची चौकशी करा
इम्तियाज जलील यांनी निदा खानसाठी पत्रकार परिषद घेऊन तिला उघड पाठिंबा दिला होता, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. "या मुलांकडे नोकरी नसताना दीड-दोन लाखांच्या बाईक आणि आयफोन कुठून येतात? हा पैसा नेमका कुठून येतो याचा तपास होणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी जलील यांची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे," असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिरसाट यांनी उपस्थित केलेले ५ महत्त्वाचे प्रश्न:
१. निदा खान दीड-दोन महिने संभाजीनगरमध्येच का लपली होती?
२. बेरोजगार तरुणांकडे महागड्या दुचाकी आणि आयफोनसाठी पैसा येतो कुठून?
३. एमआयएमने निदा खानला उघडपणे पाठिंबा का दर्शविला?
४. 'कॉर्पोरेट जिहाद'चे मास्टरमाइंड नक्की कोण आहेत?
५. निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी गर्भवती असल्याची खोटी माहिती का दिली?