Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:20 IST2026-05-08T12:17:34+5:302026-05-08T12:20:23+5:30
Suvendu Adhikari And Chandranath Rath : शुभेंदु अधिकारी आणि चंद्रनाथ यांच्या आईने थेट तृणमूल काँग्रेसला (TMC) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
पश्चिम बंगालमधील भाजपाचे दिग्गज नेते शुभेंदु अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय तणाव शिगेला पोहोचला आहे. बुधवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे त्यांच्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडानंतर आता शुभेंदु अधिकारी आणि चंद्रनाथ यांच्या आईने थेट तृणमूल काँग्रेसला (TMC) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
"मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"
चंद्रनाथ रथ यांची आई हासीरानी रथ यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी थेट 'टीएमसी'ला जबाबदार धरलं आहे. त्या म्हणाल्या, "ही टीएमसीची गुंडगिरी आहे, त्यांच्याच सांगण्यावरून हे झालं आहे. माझा मुलगा गेला, आता मला न्याय हवा आहे. मी अशी मागणी करते की, दोषींना फाशी देऊ नका, तर त्यांना जन्मठेप द्यावी. मी सुद्धा एक आई आहे आणि माझ्यासारख्या इतर कोणत्याही आईचा मुलगा मरू नये असं वाटतं."
"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
"हल्लेखोरांनी दोन-तीन दिवस रेकी केली”
सरकारकडे आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच शुभेंदु अधिकारी यांचे आभार मानताना त्या म्हणाल्या की, त्यांनी माझ्या मुलाला संरक्षण दिलं आणि आमच्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे. शुभेंदु अधिकारी यांनी ही घटना म्हणजे एक नियोजित हत्या असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोरांनी दोन-तीन दिवस रेकी केली होती, असा आरोप त्यांनी केला.
Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
"हा पूर्वनियोजित कट होता"
२०२६ च्या निवडणुकीच्या निकालांशी या घटनेचा संबंध जोडत अधिकारी म्हणाले, "चंद्रनाथ माझा जवळचा सहकारी होता आणि मी ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात (भवानीपूर) पराभव केला होता, म्हणून त्याला मारण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात चार गोळ्या लागल्याचं स्पष्ट झालं आहे, ज्यावरून हे सिद्ध होतं की हा पूर्वनियोजित कट होता." अधिकारी यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करताना याला १५ वर्षांचं 'महा-जंगलराज' म्हटलं आहे.
"सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
TMC चा पलटवार आणि CBI चौकशीची मागणी
तृणमूल काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावत या हत्येचा निषेध केला आहे. विशेष म्हणजे टीएमसीने या घटनेसाठी भाजपा समर्थक गुंडांनाच जबाबदार धरलं असून हा हिंसेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. टीएमसीने 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत लिहिलं की, "लोकशाहीत हिंसा आणि राजकीय हत्यांना कोणतंही स्थान नाही. आम्ही या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय (CBI) चौकशीची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी करतो."