काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:23 IST2026-05-08T16:22:45+5:302026-05-08T16:23:12+5:30
सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही बाजारातून काकडी खरेदी करण्यापूर्वी हजार वेळा विचार कराल.

काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही बाजारातून काकडी खरेदी करण्यापूर्वी हजार वेळा विचार कराल. बिहारच्या कटिहार रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला काकडीला गडद हिरव्या रंगाच्या मिश्रणात बुडवून ती ताजी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ केवळ धक्कादायक नाही, तर सार्वजनिक आरोग्य आणि अन्न सुरक्षा नियमांवरही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. लोक याला स्लो पॉयझन म्हणत असून प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करत आहेत.
कटिहार रेल्वे स्टेशनवर एक महिला खाली बसलेली दिसत आहे. तिने काही काकड्या या सोलून ठेवल्या आहेत. तिच्या हातात एक गडद हिरव्या रंगाचं मिश्रण आहे. ती काकडी त्या मिश्रणात बुडवत आहे, ज्यामुळे काकडीचा रंग अचानक बदलतो आणि ती अत्यंत चमकदार व हिरवी दिसू लागते. जवळच बसलेली दुसरी महिला काकड्या धुण्यास आणि या प्रक्रियेत मदत करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नैसर्गिक आणि रंगवलेल्या काकडीतील फरक स्पष्टपणे दिसून येत आहे.
आरोग्यासाठी 'अत्यंत घातक'
तज्ज्ञांच्या मते, भाज्या रंगवण्यासाठी अनेकदा 'मॅलाकाइट ग्रीन' (Malachite Green) सारख्या केमिकलचा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. या केमिकलमुळे पोटाच्या गंभीर आजारांपासून कॅन्सरपर्यंतचे धोके उद्भवू शकतात. कटिहारच्या या व्हिडिओने हे सिद्ध केलं आहे की, नफ्यासाठी काही लोक सामान्य जनतेच्या जीवाशी खेळायला मागे-पुढे पाहत नाहीत.
सोशल मीडिया पर वायरल यह वीडियो कटिहार रेलवे स्टेशन का बताया जा रहा है, खीरा को हरे रंग से रंगती दिखी महिलाएं। pic.twitter.com/AdVmfTo00G
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 8, 2026
नेटीझन्सचा संताप
व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. एका युजरने लिहिले, "जेव्हा प्रशासन कारवाई करते तेव्हा लोक यांना 'गरीब' म्हणून वाचवू लागतात, पण हे गरीब नसून लोकांना विष वाढत आहेत." तर दुसऱ्या एका युजरने सवाल केला की, रेल्वे स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी एवढी मोठी भेसळ उघडपणे कशी सुरू आहे? अशा लोकांना तात्काळ अटक करण्याची मागणी लोकांनी केली आहे.
अशी ओळखा भेसळ
जर तुम्हीही काकडी खरेदी करायला जाणार असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा
जर काकडी प्रमाणापेक्षा जास्त गडद हिरवी आणि अनैसर्गिकरित्या चमकदार दिसत असेल, तर सावध व्हा.
काकडीला कापसाने किंवा ओल्या कापडाने घासून पाहा. जर कापडाला रंग लागला, तर ती भेसळयुक्त आहे.
नेहमी नैसर्गिक दिसणाऱ्या भाज्याचं खरेदी करा आणि खाण्यापूर्वी त्या किमान ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा.
जर पाण्याचा रंग बदलला तर त्यावर केमिकल्सचा वापर केला आहे.