लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:55 IST2026-05-08T19:55:04+5:302026-05-08T19:55:26+5:30
तीन वर्षे केले पिडितेवर अत्याचार...

लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
ठाणे : काेल्हापूरातून ताब्यात घेतलेला ठाणे महापालिकेचा निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर याला ठाणे न्यायालयाने ११ मे पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमधील भाेदू अशाेक खरात याच्याकडेही त्याने अत्याचार केलेल्या पिडितेला नेले हाेते. अत्याचाराचे त्याने व्हिडिओ चित्रण केलेले असल्यामुळे त्याच्या माेबाईलचीही तपासणीसह इतर चाैकशीसाठी ठाणे गुन्हे शाखेने त्याच्या पाेलीस काेठडीची मागणी केली. ठाणे न्यायालयाने त्याला पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आहेर याच्याविरुद्ध ठाण्यातील कासारवडवली पाेलीस ठाण्यात २० एप्रिल २०२६ राेजी पालिकेतील एका कर्मचारी महिलेने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला हाेता. या तक्रारीत २०२० ते २०२३ या कालावधीत आहेर याने आपल्या पदाचा गैरवापर करून पिडितेची लैंगिक छळवणूक केल्याचा आराेप आहे. हिरानंदानी इस्टेटमधील फ्लॅटवर बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारापूर्वी त्याने तिला अमली पदार्थ सदृश्य पावडर नाकाने ओढण्यास दिली. तिला गुंगी आल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले.
अंमली पदार्थ सेवनाचे तसेच लैंगिक संबंधाचे चित्रण पतीला दाखविण्याची धमकी देत तिच्यावर त्याने वारंवार अत्याचार केल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले हाेते. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्याकडेही या पिडितेला नेत तिथे तिच्यावर लिंबू उतरवून तिला माेती माळ परिधान करण्यास दिली. हाच गुन्हा दाखल झाल्यानंतर ताे भूमीगत झाला हाेता. काेल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने ७ एप्रिल राेजी राबविलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये ताे एका लाॅजमध्ये सापडला. ही माहिती मिळताच त्याच्या मागावर असलेल्या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पेालीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या पथकाने त्याला काेल्हापूरातून ताब्यात घेतले.
आहेर अटक टाळण्यासाठी भूमीगत झाला हाेता. त्याने या महिलेला काेणती गुंगीकारक पावडर दिली. त्याने चित्रण केलेला माेबाईलही हस्तगत करण्यात येणार आहे. त्याला आणखी काेणी यात मदत केली का? अशा सर्व बाबींच्या चाैकशीसाठी त्याला पाच दिवस पाेलीस काेठडी देण्याची मागणी सरकारी वकील कविता नेसुरकर यांनी न्यायालयात शुक्रवारी केली. सर्व बाजू पडताळून त्याला ११ मे पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयानें दिले.