चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:13 IST2026-05-07T16:12:04+5:302026-05-07T16:13:05+5:30
Chirag Paswan Party Punjab Election: चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ११७ जागांवर लढण्याची घोषणा केली आहे.

चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
चंदीगड: आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारचे खंबीर नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या 'लोक जनशक्ति पक्ष (रामविलास)' ने पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पंजाब प्रभारी डॉ. के.पी. चौधरी यांनी चंदीगड प्रेस क्लबमध्ये ही माहिती दिली.
पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आगामी ९ मे रोजी जालंधर येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उमेदवारांची निवड आणि प्रचाराच्या आराखड्यावर मंथन होईल. यानंतर, खुद्द चिराग पासवान पंजाबचा दौरा करणार असून १४ जून रोजी लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये एका भव्य कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमात सुमारे १०,००० लोकांच्या उपस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
भाजपसोबत युती होणार का?
केंद्रात भाजपचे सहकारी असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची तयारी दर्शवली असली, तरी भाजपसोबतच्या युतीचे दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत. "भाजपसोबतच्या युतीची शक्यता नाकारता येत नाही, कारण केंद्रात आम्ही एकत्र आहोत. मात्र, युतीबाबतचा अंतिम निर्णय निवडणुकीच्या वेळीच घेतला जाईल," असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचे मुख्य मुद्दे: बेरोजगारी आणि नशा
पंजाबमधील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करताना डॉ. चौधरी म्हणाले की, राज्यात बेरोजगारी आणि तरुणांमधील अमली पदार्थांचे (नशा) वाढते प्रमाण ही सर्वात मोठी समस्या आहे. पक्ष आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांना प्राधान्य देईल. तसेच, पंजाबमध्ये ३२ ते ३४% अनुसूचित जातीचे मतदार आहेत, जे पक्षाचा मुख्य आधारस्तंभ ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.