देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:00 IST2026-05-07T13:58:42+5:302026-05-07T14:00:41+5:30
९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये ताशी ७० किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्येही सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळण्याचा धोका असेल.

देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरीसह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक भागात पुढील काही दिवसांपर्यंत जोरदार पाऊस, वादळी वारे आणि वीज कोसळण्याच्या अलर्ट जारी केला आहे. १० ते १२ मे कालावधीत उत्तर पश्चिम भारतात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वारे ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहू शकतात.
IMD च्या माहितीनुसार, पुढील काही दिवसात उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेशातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी या भागात ६-७ दिवसांपर्यंत मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, विदर्भ आणि तेलंगणामध्ये गारपिटीची शक्यता आहे. ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये ताशी ७० किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्येही सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळण्याचा धोका असेल.
मौसम संबंधी चेतावनी
— India Meteorological Department (@Indiametdept) May 6, 2026
मुख्य बिंदु
(i)उत्तर-पश्चिम भारत में10-12 मई, 2026 को अलग-अलग स्थानों पर गरज-चमक, बिजली और40-60 किमी/घंटा की रफ्तार से तेज हवा की संभावना है।
(ii)पूर्वोत्तर भारत में कई स्थानों पर 06 मई, 2026 (आज) को व्यापक वर्षा के साथ गरज-चमक, बिजली और 40-60 किमी/घंटा की… pic.twitter.com/KvKhJjTZNt
उत्तर प्रदेशात हवामान पुन्हा एकदा बदल होत आहे. कानपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. हवामान विभागाने ७ मे रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या काळात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. लखनौ, कानपूर, वाराणसी आणि मेरठमध्ये संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याची आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे असा अंदाज IMD ने दिला. या वादळामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, राजधानी दिल्लीतील हवामान आता कोरडे झाले असून तापमान हळूहळू वाढू लागले आहे. आजपासून उष्णता आणखी वाढण्याची शक्यता असून शुक्रवारपर्यंत कमाल तापमान ४० अंशांच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार १० मे रोजी एक नवीन वेस्टर्न डिस्टबेंस एक्टिव्ह होऊ शकतो. मात्र याचा दिल्लीतील हवामानावर काय परिणाम होईल ते पुढील एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. सध्या तरी १५ मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. ३ ते ५ मे दरम्यान दिल्ली-एनसीआरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे.