तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:27 IST2026-05-07T14:26:02+5:302026-05-07T14:27:24+5:30
Wrong Mobile Recharge Refund: चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला तर पैसे परत कसे मिळवायचे? पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या सविस्तर.

तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
आजच्या डिजिटल युगात मोबाईल रिचार्ज करणे अत्यंत सोपे झाले आहे. एका क्लिकवर आपण स्वतःचा किंवा घरच्यांचा रिचार्ज करतो. मात्र, घाईघाईत अनेकदा एक अंक चुकला तरी तेच रिचार्ज दुसऱ्याच्या नंबरवर जातात. अशा वेळी काय करावे? पैसे परत मिळतील का? असे अनेक प्रश्न असतात.
रिचार्ज चुकला तर सर्वात आधी 'हे' करा
जर तुमच्याकडून चुकीच्या नंबरवर रिचार्ज झाला असेल, तर वेळ न घालवता खालील पावले उचला:
१. कस्टमर केअरला कॉल करा: तुमच्या सिम कार्ड कंपनीच्या (उदा. Jio, Airtel, Vi) कस्टमर केअर नंबरवर त्वरित फोन करा.
२. तपशील तयार ठेवा: त्यांना तुमची ट्रान्झॅक्शन आयडी (Transaction ID), रिचार्जची रक्कम, वेळ आणि ज्या नंबरवर चुकून रिचार्ज झाला आहे तो नंबर सांगा.
३. ईमेलद्वारे तक्रार: कॉलसोबतच कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर पुराव्यांसह (पेमेंट स्क्रीनशॉट) तक्रार नोंदवा.
पैसे परत मिळतील का?
याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही आहे. हे सर्वस्वी तुमच्या टेलिकॉम कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून असते. जर तुम्ही रिचार्ज झाल्या झाल्या काही मिनिटांत तक्रार केली, तर काही कंपन्या तो रिचार्ज रिव्हर्स करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात.
जर समोरच्या व्यक्तीने तो डेटा किंवा बॅलन्स वापरला असेल, तर पैसे परत मिळणे कठीण असते. काही ॲप्स (उदा. Google Pay, PhonePe) केवळ पेमेंट गेटवे असतात, त्यामुळे अंतिम निर्णय टेलिकॉम कंपनीच घेते.
अशी चूक पुन्हा टाळण्यासाठी टिप्स
ज्या नंबरवर तुम्ही वारंवार रिचार्ज करता, ते नंबर तुमच्या रिचार्ज ॲपमध्ये सेव्ह करून ठेवा. 'Pay' बटण दाबण्यापूर्वी स्क्रीनवर दिसणारा नंबर पुन्हा एकदा नीट तपासा. शक्यतो नंबर टाईप करण्याऐवजी कॉन्टॅक्ट लिस्टमधून नंबर निवडा.