ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:37 IST2026-05-07T15:36:16+5:302026-05-07T15:37:16+5:30
Operation Sindoor News: आज ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अवघ्या साडे तीन दिवसांच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या उडवलेल्या धुळधाणीबाबत माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलांनी गतवर्षी ७ मे ते १० मे या कालावधील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी तळांना लक्ष्य केले होते. आज या कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अवघ्या साडे तीन दिवसांच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या उडवलेल्या धुळधाणीबाबत माहिती दिली.
भारताच्या सैन्यदलांच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे सांगितले. लेफ्टिनेंट जनरल राजीव घई, एअर मार्शल अवधेश भारती आणि व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही कारवाई म्हणजे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरोधात भारताने दाखवलेल्या दृढ इच्छाशक्तीचं प्रदर्शन आहे, असे सांगितले. या कारवाईदरम्यान, भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
ऑपरेशन सिंदूरवेळी डीजीएमओ असलेल्या लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या इतिहासातील एक मोठा क्षण सिद्ध झाला आहे. सरकारने सैन्यदलांना स्पष्ट आदेश आणि व्यावसायिक निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे पूर्ण कारवाई अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पूर्णत्वास नेण्यात आली.
तर एअर मार्शल अवधेश भारती यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर सध्यातरी थांबवण्यात आलं आहे. भारतीय सैन्यदलाचं साधं तत्त्वज्ञान आहे, ते म्हणजे जगा आणि जगू द्या. मात्र जर कुणाला आमची शांतता हा कमकुवतपणा वाटला तर आम्ही निर्णायक कारवाई करतो, असा इशाराही त्यांनी दिला.