मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:00 IST2026-05-07T14:54:59+5:302026-05-07T15:00:49+5:30
परीक्षेत मार्क कमी पडल्याच्या रागातून बापानेच चिमुकल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे.

मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
Daund Crime: परीक्षेतल्या गुणांवरुन संतापलेल्या एका पित्याने आपल्याच ९ वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देउळगाव राजे गावात ही अत्यंत संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. वर्गात सावत्र भावापेक्षा कमी गुण मिळाल्याने रागातून आणि मार्कशीटमध्ये खाडाखोड केल्याने संतापलेल्या बापाने आपल्याच मुलीची लाकूड कापण्याच्या कटरने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम दुर्योधन चव्हाण याच्या मुलाचा (संस्कार) आणि मुलीचा शाळेचा निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेत संस्कार वर्गात पहिला आला होता, तर अनामिका दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. निकालावरून मुलाने अनामिकाला चिडवल्यामुळे ती दुखावली गेली होती. भावापेक्षा मागे राहिल्याच्या दबावातून तिने आपल्या मार्कशीटमध्ये खाडाखोड करून स्वतःला पहिल्या क्रमांकावर आणि भावाला दुसऱ्या क्रमांकावर दाखवले.
मार्कशीटमधील 'ती' खाडाखोड जीवावर बेतली
जेव्हा ही बाब आरोपी शांतारामच्या लक्षात आली, तेव्हा त्याचा राग अनावर झाला. आपली मुलगी खोटं बोलली आणि अभ्यासात मागे राहिली, या रागाच्या भरात त्याने घरातील लाकूड कापण्याच्या मशीनने अनामिकाच्या गळ्यावर वार केला. हा वार इतका भीषण होता की, चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
हत्या केल्यानंतर या निर्दयी पित्याने गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने अनामिकाचा मृतदेह कपड्यात गुंडाळला आणि घरामागील परिसरात त्याला आग लावून दिली. हा अपघात असल्याचे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.
पत्नी आणि साथीदारावरही कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी केवळ शांतारामलाच नाही, तर त्याच्यासोबत राहणाऱ्या चिंकी भोसले या महिलेलाही अटक केली आहे. चिंकीवर आरोप आहे की, तिने ही हत्या माहीत असूनही पोलिसांपासून लपवून ठेवली आणि पुरावे नष्ट करण्यात शांतारामला मदत केली. मुलीच्या आईवरही माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी सांगितले की, "मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याची डीएनए चाचणी केली जाणार आहे. आरोपीने कटरने गळा चिरून ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे." सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.