भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:42 IST2026-05-07T16:40:32+5:302026-05-07T16:42:16+5:30
Husband Killed Wife: सात वर्षांपूर्वी त्याने कुटुंबातील काही लोकांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला. पण, गेल्या काही महिन्यांत त्यांच्यात वाद सुरू झाले. भांडणांनी प्रेमाच्या नात्याचा भयंकर शेवट झाला.

भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले
ती पोलीस ठाण्याजवळ आली होती, तितक्या तिचा पती तिथे आला. त्याने चाकू काढला आणि सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात ती खाली कोसळली. रक्ताच्या थारोळ्यातच तिने जीव सोडला. तेलंगणातील सूर्यापेट शहरात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
सिरीशा असे मयत महिलेचे नाव असून, ती मूळची आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील जग्गापेट येथील होती. तर आरोपी असलेला तिचा पती मनीदीप हा तेलंगणातील कोदाड शहरातील आहे.
सात वर्षांपूर्वी केले होते लव्ह मॅरिज
सिरीशा आणि मनीदीपचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. त्यांच्या विवाहाला कुटुंबातील काही लोकांचा विरोध होता, पण त्यामुळे त्यांनी त्यांचा विरोध झुगारला आणि सोबत संसार करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गेल्या चार-पाच महिन्यांपासून सिरीशा आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू झाले. कौटुंबिक वाद वाढत गेले आणि सिरीशाने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांकडे पतीपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. सातत्याने होत असलेले वाद आणि सिरीशाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा मनीदीपला राग आला.
सिरीशाला भरस्त्यातच संपवले
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सिरीशा पोलीस ठाण्याजवळच उभी होती. त्याचवेळी मनीदीप तिथे आला. त्याने चाकू काढला आणि सपासप सिरीशावर वार करत सुटला. हे इतकं पटकन घडले की आजूबाजूच्या लोक मध्यस्थी करेपर्यंत सिरीशा खाली रक्ताच्या थारोळ्यात पडली.
रिक्षा स्टॅण्ड परिसरात हे घडल्याने दुकानदार आणि इतर लोक आले आणि त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर काही पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पण, तिथे पोलीस येईपर्यंत सिरीशाचा जागेवरच मृत्यू झाला.
आरोपीने सिरीशाची हत्या करण्याचा कट आधीच मनात केला होता आणि त्याने तयारीनिशी येऊन तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हत्येचा कारणाचा तपास सुरू केला आहे.