Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:23 IST2026-04-19T19:19:54+5:302026-04-19T19:23:33+5:30
जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची सायबर सुरक्षा संस्था CERT-In ने क्रोममधील गंभीर बगबाबत इशारा दिला आहे. या त्रुटीचा फायदा घेत हॅकर्स तुमच्या संगणकावर दूरून नियंत्रण मिळवू शकतात.

CERT-Inच्या अहवालानुसार, क्रोमच्या काही जुन्या व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या बग्समुळे हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये ‘रिमोट अॅक्सेस’ मिळवू शकतात. म्हणजेच, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या संगणकात घुसून डेटा चोरू शकतो किंवा हानिकारक सॉफ्टवेअर चालवू शकतो.

सर्वात धोकादायक बाब म्हणजे हा हल्ला खूप सहज होऊ शकतो. तुम्ही एखाद्या संशयास्पद वेबसाइटवर क्लिक केला किंवा अनोळखी लिंक उघडली, तरी पार्श्वभूमीत हॅकिंग सुरू होऊ शकते. अनेकदा याची कल्पनाही वापरकर्त्याला येत नाही.

सायबर तज्ज्ञांच्या मते, क्रोममधील ANGLE, Skia आणि PDFium या घटकांमधील त्रुटींमुळे ‘heap buffer overflow’ सारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे सिस्टम अधिक असुरक्षित बनत आहे.

Windows, macOS आणि Linux या प्लॅटफॉर्मवर जुने Chrome व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना सर्वाधिक धोका आहे. जर तुम्ही अजूनही ब्राउझर अपडेट केले नसेल, तर तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो.

गुगलने या समस्येवर उपाय जारी केला आहे. त्यामुळे त्वरित क्रोम अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी क्रोम उघडा वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा. Settings → About Chrome मध्ये जा. नवीन अपडेट इन्स्टॉल करा आणि ब्राउझर रीस्टार्ट करा.

फक्त अपडेट नाही, सावधगिरीही गरजेची आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, संशयास्पद ईमेल टाळा. सुरक्षित वेबसाइटच वापरा. लक्षात ठेवा, छोटासा निष्काळजीपणा मोठ्या सायबर हल्ल्याला आमंत्रण देऊ शकतो.

















