होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:12 IST2026-04-18T17:10:04+5:302026-04-18T17:12:00+5:30
Iran attacks oil tankers: इराणच्या गनबोट्सनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर गोळीबार केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि इराणचे कडक लष्करी नियंत्रण यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर संकट निर्माण झाले आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
मध्य-पूर्वेतील परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र असतानाच शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटीश लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी नौकांकडून एका तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शांत असलेला हा सागरी मार्ग पुन्हा एकदा धोकादायक बनला आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवारी आठ तेल टँकरचा एक मोठा ताफा होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. बऱ्याच दिवसांनंतर सुरू झालेली ही मोठी वाहतूक होती, मात्र इराणने अचानक या जहाजांवर गोळीबार केला. या घटनेनंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा कडक लष्करी नियंत्रण लागू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या नौदलाने केलेल्या नाकेबंदीला उत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचे इराणने म्हटले आहे.
इराणने कालच होर्मुझ सर्व मालवाहू जहाजांसाठी सुरु केल्याची घोषणा केली होती, परंतू हेकेखोर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इराणसाठी होर्मुझची नाकाबंदी सुरुच ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे इराणने देखील अमेरिका असे वागली तर पुन्हा होर्मुझ बंद करण्याची धमकी दिली होती. त्याचे परिणाम आज उमटले आहेत. अमेरिकेने शब्द फिरविल्याचा आरोप इराणने केला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी शत्रू राष्ट्रांना कडक शब्दांत ताकीद दिली असून, इराणचे नौदल कोणत्याही आक्रमणाला उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच इराणसोबत लवकरच शांतता करार होईल असे संकेत दिले होते. मात्र, त्याच वेळी त्यांनी एक गंभीर इशाराही दिला आहे. जर बुधवारपर्यंत कोणताही ठोस शांतता करार झाला नाही, तर पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते.
सध्या लागू असलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम संपत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.