बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:10 IST2026-04-18T18:09:43+5:302026-04-18T18:10:32+5:30
ज्या गुन्हेगाराने बँक मॅनेजरला ओलीस ठेवले होते, त्याने 'मला लॉकरची चावी दे' असं म्हटले होते

बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
सिंगरौली - मध्य प्रदेशातील १५ कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या बँक दरोड्याच्या प्रकरणात नवं वळण लागलं आहे. या घटनेत बिहारमधील औरंगाबाद येथे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. बँकेची महिला मॅनेजर छत्तीसगडची असून सोने कोणत्या लॉकरमध्ये ठेवले आहे, हे दरोडेखोरांना आधीच माहीत होते.
शुक्रवारी सिंगरौली येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेल्या दरोड्यामुळे सरकारमध्येही चिंता पसरली. मंत्री, आमदार, खासदार आणि पोलीस विभागाचे प्रमुख डीजीपी यांनी सिंगरौली येथे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेतली आणि सूचना जारी केल्या. शनिवारी या बँक दरोड्यात आंतरराज्यीय गुन्हेगारांचा सहभाग असल्याचं समोर आले. आज दुपारी छत्तीसगड आणि बिहार पोलिसांच्या मदतीने औरंगाबादमधून दोन गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती समोर आली.
प्रत्यक्षदर्शी आणि बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बँक लुटारूंना बँकेचा कानाकोपरा माहीत होता. मॅनेजर छत्तीसगडच्या होत्या आणि बँकेच्या कोणत्या लॉकरमध्ये सोने ठेवले होते हेही त्यांना माहित होते. ज्या गुन्हेगाराने बँक मॅनेजरला ओलीस ठेवले होते, त्याने 'मला लॉकरची चावी दे' असं म्हटले होते. जेव्हा त्या संकोच करू लागल्या, तेव्हा 'तू छत्तीसगडची आहेस, मला तुझे घर माहित आहे. मी तिथे येऊन तुला गोळी घालीन. मला गोल्ड लोनच्या लॉकरची चावी दे असं तो म्हणाला. जेव्हा महिला मॅनेजरने चावी दिली नाही, तेव्हा त्याने त्यांना कानशिलातही मारली. त्याने मॅनेजरच्या कपाळावर बंदूक ठेवून धमकी दिली.
टोळीचा म्होरक्या बुटका माणूस, ते बिहारी भाषेत बोलायचे
दरोड्याच्या वेळी तिथे हजर असणाऱ्या बँकेच्या ग्राहकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाच गुंडांपैकी एकाने हेल्मेट घातले होते. गुंडांपैकी एक जण उंचीने बुटका होता. सर्वजण त्याच्या निर्देशानुसार काम करत होते. तोच सूचना देत होता. आरोपी एकमेकांशी बिहारी लहेजात बोलत होते. त्यांनी संपूर्ण दरोडा अवघ्या २० मिनिटांत पार पाडला आणि ते पळून गेले असं त्यांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, बिहारमधील औरंगाबाद येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी झारखंडमध्ये लपून बसल्याचा संशय आहे. मध्य प्रदेश पोलीस बिहारला रवाना झाले आहेत असं सिंगरौलीचे एसपी मनीष खत्री यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. पोलिसांनी गुन्हेगारांच्या अटकेसाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सध्या पोलिसांनी आरोपींची नावे उघड केलेली नाहीत.