नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:42 IST2026-04-18T17:42:20+5:302026-04-18T17:42:37+5:30
Nida Khan spotted at Mumbra Hospital: नाशिक TCS प्रकरण: संशयित निदा खान मुंब्र्यात आली होती; हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आणि डॉक्टरांचा मोठा खुलासा.

नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
नाशिकमधील टीसीएस बीपीओ युनिटमधील लैंगिक छळवणूक आणि धर्मांतरण प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान असे आढळले आहे की, निदा खान ११ आणि १३ एप्रिल रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील ब्लॉसम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ११ एप्रिल रोजी निदा तिच्या पतीसोबत आली होती, तर १३ एप्रिल रोजी ती एकटीच उपचारासाठी आली होती. तिला पोटदुखीचा त्रास होता आणि प्रवासासाठी ती सक्षम नव्हती. या कारणास्तव तिला 'मेडिकल लीव सर्टिफिकेट' (वैद्यकीय रजा प्रमाणपत्र) देण्यात आले होते, अशी माहिती डॉ. शमायरा आझमी यांनी दिली.
निदाच्या वकिलांनी ती गरोदर असल्याचा दावा केला असून, तिने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. नाशिक पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत. पतीने सांगितल्यानुसार तिच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले असता घर बंद असल्याचे आढळले.
निदा आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल फोन सध्या बंद असल्याने पोलिसांना तिचे लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत आहेत. सुरुवातीला तिला एचआर हेड म्हटले जात होते, मात्र ती बीपीओ युनिटमध्ये 'टेली-कॉलर' म्हणून कार्यरत होती, असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अश्विन चैनानी, आसिफ अन्सारी, शफी शेख यांसह एकूण नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.