JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:57 IST2026-04-18T16:48:40+5:302026-04-18T16:57:37+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजिस्टिक पार्कमधील एका केमिकल प्लांटमध्ये अचानक पहिला स्फोट झाला. यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आणि लागून असलेल्या इतर दोन प्लांटमध्येही स्फोट झाले.

JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) क्षेत्रातील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमध्ये आज दुपारी भीषण स्फोटासह मोठी आग लागली. एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आगीची भीषणता इतकी मोठी आहे की धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत.
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजिस्टिक पार्कमधील एका केमिकल प्लांटमध्ये अचानक पहिला स्फोट झाला. यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आणि लागून असलेल्या इतर दोन प्लांटमध्येही स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची भीतीपोटी मोठी पळापळ झाली.
आग पसरण्याचा धोका
ज्या ठिकाणी ही आग लागली आहे, त्याच्या मागील बाजूस डोंगराळ भाग आहे. त्यामुळे ही आग डोंगराकडे पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, घटनास्थळाच्या बाजूलाच इतर केमिकल कंपन्या असल्याने हा धोका अधिकच वाढला आहे.
घटनेची माहिती मिळताच सिडको आणि जेएनपीटी अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परिसरात अनेक केमिकल कंपन्यांचे जाळे असल्याने आग अधिक पसरू नये, यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र, आगीची भीषणता पाहता मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.