आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:41 IST2026-04-18T16:39:47+5:302026-04-18T16:41:00+5:30
America vs Cuba: अमेरिकन नौदलाच्या MQ-4C Triton या सर्वात महागड्या ड्रोनने क्युबाच्या किनारपट्टीवर ६ तास पाळत ठेवली. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका क्युबामध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे का?

आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
व्हेनेझुएलातील राजकीय उलथापालथीनंतर आता अमेरिकेची नजर 'क्युबा'वर वळल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन नौदलाचे सर्वात प्रगत आणि महागडे ड्रोन MQ-4C Triton क्युबाच्या समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर सुमारे ६ तास घिरट्या घालत होते. या घटनेमुळे कॅरिबियन समुद्रात तणाव वाढला असून, क्युबामध्येही 'ऑपरेशन मादुरो' सारखी मोहीम राबवली जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने अंमली पदार्थांची तस्करी आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप ठेवून मोठे बक्षीस जाहीर केले होते. क्युबा हा व्हेनेझुएलाचा सर्वात जवळचा मित्र देश मानला जातो. क्युबामध्ये रशिया आणि चीनचा वाढता हस्तक्षेप अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो, असे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळेच क्युबाच्या किनारपट्टीवर सुरू असलेली ही पाळत एका मोठ्या लष्करी किंवा राजकीय मोहिमेची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेचे सर्वात शक्तिशाली 'डोळे'
ज्या ड्रोनने क्युबाच्या किनाऱ्यावर घिरट्या घातल्या, ते साधेसुधे ड्रोन नाही. MQ-4C Triton हे अमेरिकन नौदलाचे सर्वात महागडे पाळत ठेवणारे ड्रोन आहे. विशेषता: हे ड्रोन ३६० अंश कोनात समुद्रावर लक्ष ठेवू शकते. एका वेळी २४ तासांहून अधिक काळ हवेत राहण्याची आणि ५०,००० फूट उंचीवरून हाय-रिझोल्यूशन फोटो घेण्याची याची क्षमता आहे. शत्रूची जहाजे, पाणबुड्या आणि किनारपट्टीवरील लष्करी हालचालींचा अचूक वेध घेण्यासाठी याचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे सुमारे २२०० कोटींचे ड्रोन होर्मुझच्या खाडीत कोसळले होते.
रशिया-चीनच्या हालचालींवर नजर?
क्युबाने अलीकडच्या काळात रशियाच्या युद्धनौकांना आपल्या बंदरात जागा दिली होती. तसेच चीन क्युबामध्ये गुप्तचर केंद्र उभारत असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपले सर्वात प्रगत ड्रोन पाठवून क्युबा आणि तिथल्या परकीय लष्करी हालचालींना घेरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते.