काही लोकांना दिवसा व्यवस्थित जेवण करूनही रात्री वारंवार भूक लागते. रात्री २ किंवा ३ वाजता अचानक जाग आली की काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते. पण याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ही केवळ एक सवय आहे की यामागे एखादा आजार दडला आहे? तज्ज्ञांच्या मते, कधीतरी रात्री भूक लागणं सामान्य आहे, पण दररोज असं होणं हे आरोग्यासाठी योग्य नाही.
दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयातील सिनिअर रेसिडेंट डॉ. दीपक कुमार सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री भूक लागण्याचा सरळ अर्थ असा आहे की, रात्रीच्या वेळी सुद्धा शरीराला ऊर्जेची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत मेंदू शरीराला भूक लागल्याचे संकेत देतो. जे लोक कोणत्याही कारणामुळे उशिरापर्यंत जागे राहतात, त्यांच्या बाबतीत हा प्रकार अनेकदा घडतो.
नाईट इटिंग सिंड्रोम
काही प्रकरणांमध्ये रात्री वारंवार भूक लागणं हे एका सिंड्रोमचं लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेत याला 'नाईट इटिंग सिंड्रोम' (Night Eating Syndrome) असं म्हटलं जातं. यात व्यक्तीला रात्री जास्त भूक लागते आणि ती व्यक्ती वारंवार उठून काहीतरी खाते. जर हे दररोज घडत असेल, तरच याला सिंड्रोम मानलं जातं. आठवड्यातून एकदा-दोनदा असा अनुभव येणं सामान्य आहे.
उशिरापर्यंत जागणं आणि भूक यांचा संबंध काय?
डॉ. दीपक यांच्या मते, जे लोक उशिरापर्यंत जागे राहतात त्यांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे शरीरातील 'घ्रेलिन' (Ghrelin) नावाचे हार्मोन योग्यरित्या कार्य करत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे हे हार्मोन वाढतं आणि परिणामी रात्री वारंवार भूक लागते. जर भुकेचा हा पॅटर्न सातत्याने असाच राहिला, तर ही बाब सामान्य नाही. यामुळे भविष्यात लठ्ठपणा वाढण्यापासून ते लिव्हरच्या आजारांपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात.
कसं करायचं कंट्रोल?
मानसिक ताण घेऊ नका.
दिवसभरात ३-४ वेळा सकस आहार करा.
रात्रीचं जेवण हलकं ठेवा.
उशिरापर्यंत जागं राहण्याची सवय बदला.
जर या गोष्टींनी फरक पडत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
