रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:26 IST2026-04-18T16:24:02+5:302026-04-18T16:26:39+5:30
कपूर खानदानातील तीन पिढ्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. आता कपूर कुटुंबातील चौथ्या पिढीतील आणखी एक सदस्य अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.

रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार
कपूर खानदानातील तीन पिढ्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. आता कपूर कुटुंबातील चौथ्या पिढीतील आणखी एक सदस्य अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. रणबीर कपूरची भाची अर्थात अभिनेत्याची बहीण रिद्धिमा कपूरची मुलगी समारा सहानी पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. 'दादी की शादी' (Daadi Ki Shaadi) या खास प्रोजेक्टनिमित्ताने ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात रिद्धिमा लेकीसोबत झळकणार आहे.
रिद्धिमा आणि समाराचे पदार्पण
रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरने आजवर स्वतःला लाईमलाईटपासून दूर ठेवले होते, मात्र आता ती ग्लॅमरच्या जगात एन्ट्री करत आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये तिची मुलगी समारा देखील तिच्यासोबत दिसणार आहे. या आगामी सिनेमामध्ये या माय-लेकींची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या सिनेमाचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून, त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आणि कॉमेडियन कपिल शर्मा 'सेन्टी' (Senti) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. नीतू कपूर यांचा उत्साह आणि कपिल शर्माचा टायमिंग यामुळे या प्रोमोला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. रिद्धिमा आणि समारासोबतच नीतू कपूर आणि कपिल शर्माची जुगलबंदी या सिनेमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
सोशल मीडियावर चर्चा
या सिनेमाच्या निमित्ताने कपूर कुटुंबातील तीन पिढ्यांना (नीतू कपूर, रिद्धिमा आणि समारा) एकाच सिनेमात पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. रिद्धिमाने यापूर्वीच एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. आता ती पूर्णपणे मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होताना दिसत आहे. 'दादी की शादी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, कपूर कुटुंबाचा हा नवा अंदाज पाहण्यासाठी सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा रंगली आहे.