Virat Kohli Takes KL Rahul Catch : बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात १७५ धावांचा बचाव करताना फिल सॉल्ट आणि जितेश शर्मा यांनी सर्वोत्तम फिल्डिंगचा नजराणा पेश केला. पॉवर प्लेमध्ये या दोन भिडूंनी अफलातून झेल टिपत मैफील लुटल्यावर विराट कोहलीही पिक्चरमध्ये आला. केएल राहुलच्या क्लास खेळीला ब्रेक लावण्यासाठी विराट कोहलीनं जवळपास २१ मीटर अंतर धावत येऊन अशक्यप्राय वाटणारा झेल टिपत "अभी तो मै जवान हूँ..." तोऱ्यात फिटनेसचा हिट शो दाखवून दिला. त्याने घेतलेला झेल पाहून स्टँडमध्ये उपस्थितीत असलेली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही त्याला खास दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
ग्रीन जर्सीत विराट कोहली घरच्या मैदानात फलंदाजीत आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. पण फिल्डिंगमध्ये त्याने त्याची कसर भरून काढल्याचे दिसून आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाज दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला धक्क्यावर धक्के देत असताना केएल राहुलनं अर्धशतकी खेळी करत "कांतारा शो टू बी कंट्युन्यू..." ची झलक दाखवणारी खेळी साकारली. पण क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसवा ठरला. विराट कोहलीनं लाँग-ऑफवरून डावीकडे धावला आणि एक्स्ट्रा-कव्हरच्या दिशेने त्याने उत्कृष्ट झेल टिपला. केएल राहुलने ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १६७.६४ च्या स्ट्राईक रेटने ५७ धधावांची खेळी केली.
धावांचा पाठलाग करताना भुवीनं कमालीच्या इनस्विंगवर फॉर्ममध्ये असलेल्या पथुम निसंका याला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या करुण नायरच्या रुपात भुवीनं आपल्या खात्यात दुसरी विकेट मिळाली. फिल सॉल्टनं त्चाचा अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. भुवीच्या गोलंदाजीवरच यष्टीरक्षक जितेश शर्मानं सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या समीर रिझवीचा अफलातून झेल टिपल्याचे पाहायला मिळाले. त्यात कोहलीच्या सर्वोत्तम झेलची भर पडली.