'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:25 IST2026-04-18T19:24:38+5:302026-04-18T19:25:48+5:30
Indian Oil Tanker Jag Arnav firing: इराणकडून भारतीय जहाजावर गोळीबार! २० लाख बॅरल कच्च्या तेलाचा टँकर लक्ष्य; परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूताला झापले.

'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
मध्य-पूर्वेतील युद्धाचे चटके काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. इराकहून २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन येत असलेल्या 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' या दोन तेलवाहू जहाजांवर इराणच्या मच्छर आर्मीने गोळीबार केला आहे. भारताने तातडीने या कृत्याचा निषेध नोंदविला असून इराणच्या राजदूताला पाचारण केले आहे.
इराकचे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या 'जग अर्णव' या भारतीय ध्वज असलेल्या तेल टँकरवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी शनिवारी दुपारी गोळीबार केला. या घटनेनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत इराणच्या राजदूताला पाचारण करून कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
विना इशारा गोळीबार
ब्रिटनच्या 'मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन सेंटर'नुसार, इराणच्या दोन 'गनबोट्स' भारतीय जहाजाजवळ आल्या आणि त्यांनी रेडिओवरून कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गोळीबार सुरू केला. या ताफ्यात 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' ही दोन भारतीय जहाजे होती. गोळीबार झाल्यानंतर दोन्ही जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पार न करताच माघार घेतली. सुदैवाने, जहाजावरील सर्व कर्मचारी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
इराणचा आडमुठेपणा
इराणने २४ तासांपूर्वीच हा मार्ग खुला केल्याचे म्हटले होते, मात्र अमेरिकेने नाकेबंदी सुरू ठेवल्याचा आरोप करत इराणने पुन्हा एकदा या मार्गावर लष्करी बळाचा वापर सुरू केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून इराणच्या राजदूताला पाचारण करून आपला अधिकृत निषेध नोंदवला आहे. सध्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणतेही भारतीय युद्धनौका तैनात नाही, मात्र ओमानच्या खाडीत भारतीय नौदलाची युद्धनौका तैनात असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.