आयुष्यात काही क्षण असे असतात, जे केवळ आनंदच नाही तर संघर्षाचा विजय असतात. असाच एक भावुक क्षण समोर आला आहे. दिल्लीतील एका विद्यार्थिनीने दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या आईला पहिला फोन केला. तिच्या आवाजात आनंद आणि डोळ्यांत अश्रू होते. हाच क्षण आता सोशल मीडियावर लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे.
दिल्लीतील एका विद्यार्थिनीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आईला फोन करते. फोनवर ती जेव्हा म्हणते- "मम्मी, मी पास झाले", तेव्हा तिचा आवाज आनंदाने भरून येतो आणि सर्वांनाच खूप आनंद होतो.
हा व्हिडिओ 'थानसिंग की पाठशाला' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही एक अशी संस्था आहे, जी दिल्ली पोलिसातील हेड कॉन्स्टेबल थानसिंग चालवतात. येथे गरीब मुलांना मोफत शिक्षण, अभ्यासासाठी पाठबळ आणि आवश्यक सुविधा पुरवल्या जातात.
शिक्षक आणि विद्यार्थिनी दोन्ही भावूक
व्हिडिओमध्ये दिसतं की, थानसिंग आधी विद्यार्थिनीच्या आईला फोन करतात आणि सांगतात, "तुमची मुलगी पास झाली आहे, तिच्याशी बोला." त्यानंतर मुलगी आईशी बोलते आणि आनंदाच्या भरात थानसिंग यांना मिठी मारते. या दरम्यान दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात, ज्यामुळे हा क्षण अधिकच खास बनतो.
संघर्ष आणि मेहनतीचा विजय
पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे की, ही मुलगी या पाठशाळेतील सर्वात जुन्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे. अनेक अडचणी असूनही तिने कधीही हार मानली नाही आणि सातत्याने मेहनत करत राहिली. तिचं हे यश केवळ एक परीक्षा उत्तीर्ण होण्यापुरतं मर्यादित नाही, तर तिच्या उज्ज्वल भविष्याची ही एक नवी सुरुवात आहे.
नेटकरी झाले भावुक
या व्हिडिओने इंटरनेटवरील नेटकऱ्यांना भावूक केलं आहे. अनेक युजर्सनी याचं वर्णन 'हृदयस्पर्शी' असं केलं आहे. लोकांनी मुलीच्या मेहनतीचं आणि धैर्याचं कौतुक केलं. काहींनी म्हटलं की, "हा क्षण तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे." अनेकांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि "शिक्षण हेच आयुष्य बदलण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे" अशा भावना व्यक्त केल्या.
