क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:22 IST2026-04-18T19:20:53+5:302026-04-18T19:22:14+5:30
मध्य प्रदेशातील मंडला येथे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

फोटो - tv9hindi
मध्य प्रदेशातील मंडला येथे नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका वादातून मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे ९ तुकडे करून घराच्या सेप्टिक टँकमध्ये लपवून ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे ६ दिवस मोठा भाऊ मृतदेह लपवला त्याठिकाणीच राहत होता. अखेर दुर्गंधीने या भयानक रहस्याचा पर्दाफाश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आशिष साहू असं आहे. त्याच्या नातेवाईकांनी खूप शोधाशोध केल्यानंतर १५ एप्रिल रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. १७ एप्रिल रोजी आशिषचे वडील मुन्ना लाल साहू यांना घराच्या मागे असलेल्या सेप्टिक टँकमधून खूप दुर्गंधी आली. संशय आल्यावर पोलिसांच्या उपस्थितीत टँक उघडला असता, आतील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. पोत्यात आणि कपड्यात गुंडाळलेले मृतदेहाचे अनेक तुकडे तरंगत होते. पोलिसांनी तातडीने मृतदेह बाहेर काढला.
पुराव्या नष्ट करण्यासाठी केले ९ तुकडे
पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणि स्थानिक लोकांच्या जबाबाच्या आधारे मोठा भाऊ घनश्याम साहू याच्यावर संशय बळावला. असं सांगितलं जात आहे की, दोन्ही भावांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता, जो अलीकडेच आशिषने नवीन ट्रॅक्टर खरेदी करून काम सुरू केल्यावर अधिकच वाढला. असा आरोप आहे की, घनश्यामने आशिषवर तो झोपलेला असताना धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे नऊ तुकडे केले आणि ते सेप्टिक टँकमध्ये टाकले, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.
२०१९ पासून आई देखील बेपत्ता!
या हत्या प्रकरणाने जुनी घटना देखील समोर आली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही भावांची आई देखील २०१९ पासून रहस्यमयी रितीने बेपत्ता आहे. आशिषच्या या निर्घृण हत्येनंतर आता पोलीस त्या जुन्या प्रकरणाचाही या अँगलतून तपास करत आहेत. आई गायब होण्यामागेही काही भयानक रहस्य दडलं आहे का? पोलीस आता याचीही चौकशी करत आहेत.
भावा-भावांमध्ये नेहमी व्हायचे वाद
आशिषचे शेजारी गोविंद यांनी सांगितलं की, "बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत. आशिष हा साधा मुलगा होता, तो आपल्या कामाशी काम ठेवायचा. मोठ्या भावाशी त्याचं पटत नव्हतं, पण कोणी इतक्या थराला जाऊन भावाचे तुकडे करेल, असा विचार कधीच केला नव्हता." तसेच दुसरे शेजारी कैलास पटेल म्हणाले की, "घरातून दुर्गंधी आल्यानंतर पोलीस आले होते. ११ तारखेपासून मुलगा दिसत नव्हता. यांच्या कुटुंबातील आई आधीच बेपत्ता झाली आहे आणि आता हे झालं. मला वाटतं की आईची हत्याही यानेच केली असावी. याचीही चौकशी व्हायला हवी आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे."