Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals, 28th Match Rusult : वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेच्या फिरकीतील जादूसह कार्तिक त्यागीचा भेदक माऱ्यानंतर फलंदाजीत उप कर्णधार रिंकू सिंहच्या फिनिशिंग टचच्या जोरावर अखेर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सातव्या सामन्यात पहिला विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १५५ धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर १५६ धावांचे टार्गेट सेट केले होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात रिंकू सिंह याने षटकारासह नाबाद अर्धशतक साजरे करत संघाचा विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव सूर्यवंशीसहयशस्वी जैस्वालची दमदार खेळी, पण...
पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल ३९ (२९) आणि वैभव सूर्यवंशी ४६ (२८) जोडीनं राजस्थान रॉयल्सच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५२ चेंडूत ८१ धावांची भागीदारी रचली. पण दोघेही अर्धशतकाशिवाय माघारी फिरल्यावर राजस्थान रॉयल्सची फलंदाजी कोलमडली. वरुण चक्रवर्तीनं वैभव सूर्यवंशीसह रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना स्वस्तात माघारी धाडले. सुनील नरेन याने यशस्वी जैस्वालच्या रुपात महत्त्वपूर्ण विकेट घेत राजस्थानला सर्वात मोठा धक्का दिला. कार्तिक त्यागीनं आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी करत ३ विकेट्सचा डाव साधला. परिणामी राजस्थान रॉयल्सचा संघ निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
रिंकूचं नाबाद अर्धशतक अन् अनुकूलच्या खेळीसह KKR ला मिळाला पहिला विजय
राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता संघाची सुरुवातही खराब झाली सलामीवीर टिम सिफर्टसह सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणेला खातेही उघडता आले नाही. अंगकृष रंघुवंशीनं दुहेरी आकडा गाठला. पण तोही १० धावा करून माघारी फिरला. कॅमरून ग्रीनने १३ चेंडूत २७ धावांचे योगदान देत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. रोव्हमन पॉवेल २० चेंडूत २३ धावा करून परतल्यावर सामन्यात पुन्हा ट्विस्ट आले. पण रिंकू सिंह शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्याला अनुकूल रॉय याने १६ चेंडूत नाबाद २९ धावा करत उत्तम साथ दिली. रिंकू सिंह याने ३४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावांसह कोलकाता संघाला पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.