ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:38 IST2026-04-19T19:37:50+5:302026-04-19T19:38:14+5:30

संभाव्य शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अचानक कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

Will Trump come to Pakistan? Tight security in Islamabad; Lockdown-like situation in the backdrop of US-Iran talks | ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती

ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती

अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अचानक कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. शहरातील अनेक भाग सील करण्यात आले असून वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. या हालचालींमुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय बैठकीची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

ट्रम्पच्या भेटीची शक्यता?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः इस्लामाबादला येण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम कराराच्या टप्प्यावरच ते पाकिस्तान दौऱ्यावर येतील. सध्या कोणत्या पातळीवर चर्चा होणार आणि कोण सहभागी होणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

अमेरिकन विमानांची लँडिंग; हालचालींना वेग

रिपोर्टनुसार, रावलपिंडी येथील नूर खान एअरबेसवर दोन अमेरिकन कार्गो विमाने उतरली आहेत. सहसा अशा विमानांत VVIP भेटीपूर्वी आवश्यक उपकरणे आणि सुरक्षा साहित्य आणले जाते. यामुळे मोठ्या अमेरिकन प्रतिनिधीमंडळाच्या आगमनाची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

शहरात कडक निर्बंध; रेड झोन पूर्ण बंद

इस्लामाबादमध्ये रेड झोन आणि एक्सटेंडेड रेड झोन पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. या भागात सामान्य नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, इस्लामाबाद आणि रावलपिंडीदरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. खासगी वाहनांना मर्यादित परवानगी दिली असली तरी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॉटेल्स रिकामी; मोठ्या पाहुण्यांची तयारी?

शहरातील नामांकित हॉटेल्समध्येही मोठे बदल दिसत आहेत. सेरेना हॉटेल आणि मॅरियट हॉटेल यांसारख्या हॉटेल्सने नवीन बुकिंग बंद केली आहे. काही ठिकाणी सध्या राहणाऱ्या पाहुण्यांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. यावरून या हॉटेल्समध्ये उच्चस्तरीय बैठकीची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिका-ईरान चर्चेचा पहिला टप्पा १२ एप्रिलला पार पडला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र मंगळवारपर्यंत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि ईरानमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. या चर्चेचा परिणाम मध्यपूर्व आणि जागतिक राजकारणावर मोठा होऊ शकतो.

Web Title: Will Trump come to Pakistan? Tight security in Islamabad; Lockdown-like situation in the backdrop of US-Iran talks