Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:13 IST2026-04-18T12:11:42+5:302026-04-18T12:13:03+5:30
TCS Nida Khan : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिक युनिटशी संबंधित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या एका आठवड्यापासून फरार असून तिच्या लोकेशनबाबत तिच्या पतीने दिलेल्या जबाबांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पोलिसांनी निदा खानचा पती मोईन नवेद इक्बाल खान याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना सांगितलं की, निदा १४ एप्रिल रोजी घरातून बाहेर पडली असून एका नातेवाईकाकडे राहत आहे. मात्र पोलीस जेव्हा त्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा घराला कुलूप होतं आणि तेथील लोकांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ होते.
"अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
पतीने त्यानंतर पोलिसांना माहिती दिली की, निदाची मावशी नूरी शेख तिला याच आठवड्यात नाशिकला घेऊन गेली होती. मात्र नंतर त्याने असाही दावा केला की, त्याला सध्या निदा नेमकी कुठे आहे याची माहिती नाही. पोलीस फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध गोष्टांच्या आधारावर तपास करत आहेत.
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
TCS नाशिक युनिटमध्ये कार्यरत असलेल्या निदा खानची दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील मालाड आणि हिरानंदानी कार्यालयात बदली करण्यात आली होती. ही बदली अशा वेळी झाली जेव्हा तिच्या पतीला ठाण्यातील मुंब्रा येथील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) मध्ये लॉजिस्टिक ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर TCS ने तिला निलंबित केलं आहे.
"आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा TCS नाशिक युनिटमधील एका महिला कर्मचाऱ्याने तिचा सहकारी दानिश शेख याच्यावर २०२२ मध्ये लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. तक्रारीनुसार, दानिश विवाहित असल्याची माहिती तिच्यापासून लपवण्यात आली होती. दानिश शेखची बहीण असलेल्या निदा खानने तक्रारदार महिलेच्या धार्मिक श्रद्धेबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि तिच्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला.
HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
तपास पुढे सरकल्यानंतर इतर सात महिलांनीही समोर येऊन मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. फेब्रुवारी २०२२ ते मार्च २०२६ या कालावधीत वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आपला छळ केला आणि एचआर (HR) विभागाने त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असा दावा या महिलांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, यामध्ये सहा पुरुष आणि एका महिला एचआर प्रमुखाचा समावेश आहे.