हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:06 IST2026-04-18T13:04:38+5:302026-04-18T13:06:14+5:30

हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील काठुवास या छोट्याशा गावात शुक्रवारी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. ज्या मुलाच्या परतण्याची वाट कुटुंब डोळ्यात तेल घालून पाहत होते, तो अखेर घरी परतला, पण शवपेटीत.

rewari youth body returns from russia after 6 months emotional last rites | हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश

फोटो - आजतक

हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील काठुवास या छोट्याशा गावात शुक्रवारी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालं. ज्या मुलाच्या परतण्याची वाट कुटुंब डोळ्यात तेल घालून पाहत होते, तो अखेर घरी परतला, पण शवपेटीत. रशियातून तब्बल सहा महिन्यांनंतर अंशुचा मृतदेह गावात पोहोचला तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रशिया-युक्रेन युद्धात अंशुला आपला जीव गमवावा लागला होता.

अंशु आपल्या भविष्यातील स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी परदेशात गेला होता. एमबीएच्या शिक्षणासाठी रशियाला गेलेला हा तरुण ऑगस्ट २०२४ मध्ये रशियन सैन्यात भरती झाला. आपला मुलगा शिक्षणासाठी जाऊन थेट युद्धाच्या मैदानात उतरेल, याची पुसटशी कल्पनाही त्याच्या कुटुंबाला नव्हती.

ऑक्टोबरमध्ये झाला होता मृत्यू

रशियाच्या बाजूने लढताना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी युक्रेनमध्ये अंशुचा मृत्यू झाला. मात्र ही बातमी कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यानंतर मृतदेह भारतात आणण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला. या काळात त्याचे कुटुंब आशा आणि भीती अशा दोन्ही छायेत वावरत होते.

'बाबा, मी अडकलोय' - शेवटचे शब्द

अंशुचे त्याच्या कुटुंबाशी शेवटचं बोलणं १८ ऑगस्ट रोजी झालं होतं. त्यावेळी त्याने वडील राकेश कुमार यांना सांगितलं होतं की, "बाबा, मी इथे वाईट पद्धतीने अडकलो आहे... आता पुढचं बोलणं तीन महिन्यांनंतरच होईल." दुर्दैवाने, त्याचे हे शब्द कुटुंबासाठी शेवटची आठवण ठरले. त्यानंतर कुटुंबाला थेट त्याच्या मृत्यूची बातमीच मिळाली.

दूतावासाकडून मिळाली माहिती

४ एप्रिल रोजी भारतीय दूतावासाकडून कुटुंबाला फोन आला, ज्यामध्ये अंशुचा मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर १७ एप्रिल रोजी सकाळी मृतदेह दिल्ली विमानतळावर पोहोचला. शुक्रवारी सकाळी कुटुंबाने विमानतळावर सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला.

मृतदेह गावात पोहोचताच ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. अंशुच्या आईचे निधन आधीच झालं होतं. घरात सर्वात लहान असलेल्या अंशुवर त्याचा मोठा भाऊ मोहित याने अंत्यसंस्कार केले. ही घटना अशा अनेक भारतीय तरुणांची व्यथा मांडते, जे चांगल्या भविष्याचे स्वप्न घेऊन परदेशी जातात, पण परिस्थिती त्यांना अशा वळणावर नेते जिथून परतणं अशक्य होतं.

Web Title : हृदयविदारक! 6 महीने बाद रूस से लौटा बेटे का शव; परिवार का आक्रोश

Web Summary : हरियाणा के अंशु की रूस-यूक्रेन युद्ध में रूस के लिए लड़ते हुए मौत हो गई। छह महीने बाद उसका शव घर पहुंचा। उसने आखिरी बार अगस्त में अपने पिता से बात की थी और कहा था कि वह फंसा हुआ है। भारतीय दूतावास के माध्यम से परिवार को उसकी मृत्यु की खबर मिली।

Web Title : Heartbreak: Son's body arrives from Russia after 6 months.

Web Summary : Anshu, from Haryana, died in the Russia-Ukraine war while fighting for Russia. His body arrived home after six months. He last spoke to his father in August, saying he was trapped. The family received news of his death via the Indian embassy.