संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:40 IST2026-04-18T11:39:21+5:302026-04-18T11:40:26+5:30
खिल्लो तिला खूप त्रास देत होता. तो वारंवार तिला भेटायला बोलवायचा. त्यातून ती वैतागली होती.

संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका हॉटेलमध्ये एका महिलेने नात्याने मामा लागणाऱ्या व्यक्तीला निर्दयीपणे ठार मारले आहे. आधी मिरचीची पूड त्याच्या डोळ्यात फेकली, त्यानंतर सर्जिकल ब्लेडने त्याचा गळा कापला आणि रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. तेव्हा रागाच्या भरात तिने आपल्या बॅगेतून हातोडा काढून मामाच्या चेहऱ्यावर सपासप १५ वेळा वार केले. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोवर तिने मारणे सुरूच ठेवले होते.
या हत्येनंतर आरोपी महिला काही वेळ मृतदेहाशेजारीच गुपचूप बसली. त्यानंतर खोलीतून बाहेर येत जोरजोरात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तिने हत्या केल्याचे सांगितले. महिलेच्या तोंडातून हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले ज्यातून तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. संबंधित व्यक्ती नात्याने तिचा मामा लागत होता. त्याने केलेले कृत्य तिने पोलिसांना सांगितले. या हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. आता महिलेला अटक करून पुढील कार्यवाही सुरू आहे.
बळजबरीनं संबंध बनवण्यासाठी दबाव
शुक्रवारी दुपारी ३६ वर्षीय युवक त्याच्यासोबत एका महिलेला घेऊन हॉटेलला आला होता. थोडा वेळ तो बाहेर गेला आणि बिअर घेऊन परतला. या दोघांनी एकत्रित बिअर प्यायली. त्यात दोघांमध्ये वाद झाला. युवकाने बळजबरीने संबंध बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला. त्याला नकार देत असतानाही त्याने ऐकले नाही. त्याच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ होते. त्यातून तो मला ब्लॅकमेल करत होता. मी त्याला संबंध बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने हे फोटो, व्हिडिओ पतीला पाठवण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याला मारला असं महिलेने कबुली दिली.
ही महिला विवाहित होती, तिला २ मुलेही आहेत. पती मजुरीचे काम करायचा. तिचा नात्याने मामा लागणारा खिल्लो टाइल्स लावण्याचं काम करायचा. खिल्लो तिला खूप त्रास देत होता. तो वारंवार तिला भेटायला बोलवायचा. त्यातून ती वैतागली होती. म्हणूनच त्याचा काटा काढण्याचं तिने ठरवले. संपूर्ण तयारीसह ती त्याला भेटायला हॉटेलला पोहचली. तिने बॅगेतून मिरची स्प्रे, सर्जिकल ब्लेड आणि हातोडा आणला होता. खिल्लोची हत्या केल्यानंतर महिलेने त्याचा मोबाईल हिसकावून हातोड्याने फोडला. पोलिसांनी हा फोन सध्या जप्त केला आहे.
२०१४ मध्ये झालं होते लग्न
पोलिसांनी हॉटेलमधून बिअरचा कॅन, सर्जिकल ब्लेड, मिरची स्प्रे, हातोडा जप्त केला आहे. या महिलेचे लग्न २०१४ साली झाले होते. पती आणि दीर कपड्याच्या दुकानात काम करत होते. आरोपी महिलेच्या बाहेरील संबंधाबाबत घरात माहिती नव्हते. तर खिल्लो दिल्लीत टाइल्स लावण्याचं काम करत होता. तो कधी तरीच घरी यायचा. तो आग्राच्या हॉटेलला कसा पोहचला हे माहिती नाही. आरोपी महिलेशी खिल्लो कसा संपर्कात आला हेदेखील माहिती नसल्याचा मृत खिल्लोच्या भावाने पोलिसांना सांगितले.