मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 23:09 IST2026-04-18T23:08:27+5:302026-04-18T23:09:22+5:30
Iran stops Indian ships Hormuz 2026: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारी १४ जहाजे अडवून गोळीबार केला. भारताच्या तेल पुरवठ्यावर संकट असून, ओमानजवळ कंटेनर जहाजावरही हल्ला झाला आहे.

मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
मध्य-पूर्वेतील होर्मुझ खोलल्याचे जाहीर करून काही तास उलटत नाही तोच पुन्हा इराणने भारतीय जहाजांचा जथ्था रोखून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अशातच गॅस आणि कच्चे तेल घेऊन भारताकडे निघालेली ही जहाजे पुन्हा माघारी गेली परंतू या धावपळीत एक जहाज इराणी नौदलाच्या डोळ्यात धूळ फेकत होर्मुझ पार करून निसटले आहे.
कच्चे तेल, गॅस आणि खते घेऊन भारताकडे निघालेल्या १४ जहाजांच्या ताफ्याला इराणच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीत रोखले होते. १४ जहाजांचा ताफा रांगेत जात असताना इराणच्या गनबोट्सनी ताफ्यातील दोन जहाजांवर विना इशारा गोळीबार केला. पीटीआय नुसार, एका भारतीय जहाजाच्या खिडकीला गोळी लागून काच फुटली, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
या हल्ल्यानंतर ताफ्यातील १३ जहाजांनी आपला मार्ग बदलून पर्शियन आखातात परतण्याचा निर्णय घेतला. केवळ एक जहाज ही सामुद्रधुनी ओलांडण्यात यशस्वी झाले. 'जग अर्णव' आणि 'सन्मार हेराल्ड' यांसारख्या भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले. एका जहाजाने आपली ओळख पटवण्यासाठी रेडिओवर संदेशही प्रसारित केला होता. या जहाजांना इराणने परवानगी देखील दिली होती, परंतू नंतर गोळीबार करून परत माघारी पाठविले. आता यापैकी सात भारतीय जहाजे सध्या इराणच्या 'लारक' बेटाजवळ इराणच्या परवानगीच्या प्रतीक्षेत उभी आहेत.
होर्मुझमध्ये दुसरा मोठा हल्ला
भारतीय जहाजांवरील हल्ल्यानंतर काही तासांतच ओमानच्या किनाऱ्यापासून ४६ किमी अंतरावर एका कंटेनर जहाजावर अज्ञात 'प्रोजेक्टाईल'ने हल्ला झाला. यामध्ये काही कंटेनर्सचे नुकसान झाले असून, यामुळे सागरी वाहतुकीसाठी हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे.
काही काळ मार्ग खुला, मग पुन्हा बंदी
इराणने सुरुवातीला 'गुडविल' म्हणून १० दिवसांच्या युद्धविराम काळात हा मार्ग व्यावसायिक जहाजांसाठी खुला केल्याचे जाहीर केले होते. यादरम्यान ८ तेल आणि गॅस टँकर या मार्गावरून सुखरूप बाहेर पडले. मात्र, अमेरिकेने इराणच्या बंदरांवरील नाकेबंदी सुरूच ठेवल्यामुळे इराणने संतापून पुन्हा एकदा हा मार्ग बंद केला आणि कडक लष्करी नियंत्रण लागू केले.