हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 23:36 IST2026-04-18T23:35:08+5:302026-04-18T23:36:39+5:30
Congress on PM Modi speech : "५९ वेळा काँग्रेसचा जप, महिलांचे नावही नाही!" खर्गेंनी PM मोदींना आरसा दाखवला; काँग्रेसच्या ३ अटी जाहीर.

हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी अधिकृत व्यासपीठाचा वापर केवळ राजकीय चिखलफेक आणि खोटे बोलण्यासाठी केला आहे," असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या भाषणात नारी शक्तीपेक्षा काँग्रेसचाच द्वेष जास्त दिसून आला, अशी टीकाही त्यांनी केली.
खर्गे यांनी 'X' (ट्विटर) वर लिहिले की, "पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात ५९ वेळा काँग्रेसचा उल्लेख केला, तर महिलांचा उल्लेख अत्यंत कमी वेळा केला. यावरूनच त्यांचे प्राधान्य काय आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यासाठी काँग्रेस महत्त्वाची आहे, कारण काँग्रेस नेहमी इतिहासाच्या योग्य बाजूने उभी राहिली आहे." गेल्या १२ वर्षांत काहीही ठोस करता न आल्याने हताश होऊन पंतप्रधान आता लोकशाही आणि संविधानाचा अपमान करत आहेत, असा आरोप खर्गेंनी केला. महिला आरक्षण विधेयक पहिल्यांदा २०१० मध्ये राज्यसभेत काँग्रेसनेच मंजूर केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. भाजपशासित राज्यांत महिलांवरील गुन्हे वाढत आहेत. हाथरस, उन्नाव आणि हरियाणात महिला कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक यावर पंतप्रधान गप्प का? असा सवाल खर्गेंनी विचारला.
बिल्किस बानो प्रकरण...
भाजपने बलात्काऱ्यांना वाचवले आणि बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका केली, ही त्यांची नारी शक्तीबद्दलची कटिबद्धता आहे का? असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसच्या ३ प्रमुख मागण्या
सध्याच्या ५४३ लोकसभा जागांमध्येच ३३% महिला आरक्षण त्वरित लागू करणारे विधेयक आणा. महिला आरक्षण आणि परिसीमन यांची सांगड घालणे बंद करा. हा केवळ राजकीय स्वार्थासाठी नकाशा बदलण्याचा कट आहे. १४० कोटी भारतीयांची दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे.
जयराम रमेश यांची 'डिस्ट्रेस एड्रेस' म्हणून टीका
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला 'राष्ट्र के नाम संदेश' ऐवजी 'डिस्ट्रेस एड्रेस' (तणावात दिलेले भाषण) असे संबोधले. ते म्हणाले की, "जनधन, आधार आणि जीएसटी या योजना काँग्रेसच्याच आहेत. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले, मनमोहन सिंग यांनी आधार आणले आणि राजीव गांधींनी डिजिटल इंडियाचा पाया रचला. मोदींनी केवळ या योजनांचे मार्केटिंग केले आहे."