ममतांचा उजवा हात ते भाजपचे मुख्यमंत्री; शुभेंदू अधिकारींचा थक्क करणारा राजकीय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:09 IST2026-05-08T18:53:30+5:302026-05-08T19:09:26+5:30
Suvendu Adhikari: पश्चिम बंगालच्या राजकारणात अखेर एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बंगालमध्ये 'कमळ' फुलवण्यात यशस्वी ठरलेले शुभेंदू अधिकारी हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

कोलकाता येथे झालेऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करणारे अधिकारी आता बंगालची धुरा सांभाळणार आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये जेव्हा अमित शाह यांनी बंगाल विजयाची रणनीती आखली होती, तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जाणारे शुभेंदू अधिकारी यांना भाजपमध्ये प्रवेश दिला होता.

त्यावेळी मेदिनीपूरच्या सभेत शुभेंदू यांनी अमित शाह यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते. तेव्हापासून शाह हे शुभेंदू यांच्या पाठीशी भक्कम भिंतीसारखे उभे राहिले. आज जेव्हा भाजपला २०७ जागांसह ऐतिहासिक विजय मिळाला, तेव्हा विमानतळावर अमित शाह यांनी शुभेंदू यांची पाठ थोपटून दिलेली शाबासकी बरेच काही सांगून गेली.

ममता बॅनर्जींना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन हरवण्याची क्षमता केवळ शुभेंदू यांच्यात आहे. २०२१ मध्ये नंदीग्राम आणि आता २०२६ मध्ये ममतांचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींवर मात केली.

भाजपचा आकडा ३ वरून २०७ पर्यंत नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत आणि ममता सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत.

बंगालमध्ये भाजपला एका आक्रमक हिंदू नेत्याची गरज होती, ती प्रतिमा शुभेंदू यांनी सिद्ध केली आहे. शुभेंदू हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात.

५५ वर्षीय शुभेंदू अधिकारी अविवाहित आहेत. १५ डिसेंबर १९७० रोजी पूर्व मेदिनीपूरमधील कांथी येथे एका राजकीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे तीन वेळा खासदार राहिले आहेत.

शुभेंदू यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे, जे बंगालच्या ग्रामीण मतदारांना भावते. त्यांच्या नावावर कोणतीही गाडी नाही आणि त्यांच्याकडे केवळ १२ हजार रुपये रोख असून एकूण संपत्ती साधारण ८५.८७ लाख रुपये इतकी आहे.

१९८९ मध्ये काँग्रेसच्या छात्र परिषदेतून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. १९९५ मध्ये कांथी नगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांची ममतांसोबत चांगले संबंध निर्माण झाले. मोदी लाटेतही आपली लोकसभा जागा जिंकून ताकद सिद्ध केली.

२०२० मध्ये टीएमसी सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जींचा पराभव केला. त्यानंतर आता भवानीपूर आणि नंदीग्राम दोन्ही जागांवर विजय मिळवून त्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला.

शुभेंदू अधिकारी यांच्या रूपाने केवळ बंगालच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारताला भाजपचा एक तगडा आणि आक्रमक नेता मिळाला आहे. शपथविधीनंतर शुभेंदू बंगालचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारतील, ज्यामुळे बंगालच्या राजकारणात मोठा बदल अपेक्षित आहे.

















