थलापती विजयच्या यशावर साउथ अभिनेत्रींच्या प्रतिक्रिया, एकीने तर त्रिशा कृष्णनचंच केलं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 11:05 IST2026-05-05T10:58:37+5:302026-05-05T11:05:10+5:30
या सर्व अभिनेत्रींनी थलपति विजयसोबत स्क्रीन शेअर केली आहे. आता त्याच्या या ऐतिहासिक विजयावर सर्वांनी ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणूकीत टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेता थलपति विजयने ऐतिहासिक विजय मिळवला. सध्या त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे काल ४ मे रोजी हा निकाल लागला आणि त्याच दिवशी अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा वाढदिवस होता. विजय आणि त्रिशाच्या अफेअरच्या चर्चा आहेत. दोघं लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे विजयचा पत्नीसोबत काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

विजयच्या निवडणूकीतील ऐतिहासिक यशावर साउथमधील अनेक अभिनेत्रींनी पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे. यामध्ये अभिनेत्री लक्ष्मी मंचूने तर त्रिशाचाही उल्लेख केला आहे.

लक्ष्मी मंचू लिहिते, "ओएमजी! ही खरी डरकाळी आहे..विजय तुझं मनापासून अभिनंदन आहे. आज तमिळनाडूत इतिहास रचला गेला. तुझ्यासोबत अनेक जण मनाने जोडले गेलेच होते पण आता ते अधिकारानेही जोडले गेले आहेत."

यासोबत तिने त्रिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले, "नेहमीच सुंदर आणि सोज्वळ राहणाऱ्या त्रिशा कृष्णनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सेलीब्रेशन करण्यासाठी आजचा दिवस आणखी खास आहे. मला वाटतं युनिव्हर्सने तुला आज हे गिफ्टच दिलं आहे. आज तुझ्यासाठी दुहेरी आनंदाचा दिवस आहे. तुझा दिवस मॅजिकल असो."

अभिनेत्री रश्मिका मंदानानेही ट्वीट करत लिहिले, "अभिनंदन विजय सर..मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे आणि या नव्या भूमिकेत तुम्हाला पाहण्यासाठी उत्सुक आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा."

समंथा रुथ प्रभू म्हणते, "पुन्हा इतिहास रचण्यासाठी यापेक्षालअधिक गौरवशाली मार्ग असू शकत नाही. तुझी निवड नक्कीच थोर कार्यासाठी झाली आहे हे मला नेहमीच माहित होतं. हे तुझं स्वप्न होतं. तुला जे बनायचं होतं तेच तू आज घडला आहेस. ही भूमिका तूच साकारावीस याचा मला सार्थ अभिमान आहे."

अभिनेत्री नयनतारा लिहिते, "अभिनंदन विजय सर...तुम्ही आज इतिहास रचला आहात. ही तर फक्त अनेक गोष्टींची सुरुवात आहे. #क्रांती"

काजल अग्रवाल लिहिते, "विजयचं या शानदार आणि दणदणीत विजयाबद्दल मनापासून अभिनंदन! हा क्षण तुझी दूरदृष्टी, चिकाटी आणि लोकांचे तुझ्यावर असलेले अढळ प्रेम याची साक्ष देणारा आहे. तमिळनाडूच्या जनतेने अतिशय स्पष्ट आणि मोठ्या अभिमानाने आपला कौल दिला आहे. हा केवळ विजय नसून लाखो लोकांशी असलेल्या एका खोल आणि सामर्थ्यवान नात्याचा उत्सव आहे. तू या प्रेरणादायी नवीन अध्यायात पदार्पण करत असताना, तुला उदंड शक्ती आणि यश मिळो हीच सदिच्छा. ज्या बदलाची अनेकजण आशा करत आहेत, तो बदल तू घडवून आणशील अशी खात्री आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!"

















