'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:18 IST2026-05-05T14:13:53+5:302026-05-05T14:18:44+5:30

राज्य राखीव पोलीस दल भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका वादात सापडली आहे. या प्रश्नपत्रिकेत एका खासगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचिकेतीलच बहुतांश प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. 

'The government is literally playing with the lives of the youth', questions from private books in the police recruitment exam are exactly as they are | 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे

'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे

महाराष्ट्र पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचमधील प्रश्नच पोलीस भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असल्याने संपूर्ण भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की, पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी ८५ प्रश्न या खासगी पुस्तकातील आहेत. यासंदर्भातील काही व्हॉट्स चॅटिंगही समोर आले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी काही फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, "राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे."

प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि पुस्तकातील प्रश्न सारखेच

वडेट्टीवार यांनी पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि पुस्तकातील प्रश्नांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात सगळे प्रश्न सारखेच आणि क्रमवारीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अकादमी नावाने व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. त्यात आमचा तर वशिला आहे, ८५ प्रश्न जसेच्या तसे आले आहेत. पब्लिकेशन अकादमीशिवाय पर्याय नाही, असे संवाद आहेत. 

ही परीक्षा होती की त्या पु्स्तकाची चाचणी?

"महाराष्ट्र पोलीस भरतीतील एसआरपीएफ गट ५, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट?", असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला. 

"ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे. पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

पारदर्शकता पोस्टरपुरतीच शिल्लक राहील

"३९७७ मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल", अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

Web Title : महाराष्ट्र पुलिस भर्ती परीक्षा विवादों में: प्रश्न पुस्तक से नकल

Web Summary : महाराष्ट्र पुलिस भर्ती परीक्षा विवादों में घिरी, प्रश्नपत्र एक निजी प्रकाशन से नकल किये जाने का आरोप। विजय वडेट्टीवार ने सरकार पर युवाओं के साथ धोखा करने का आरोप लगाया।

Web Title : Maharashtra Police Recruitment Exam Hit by Controversy: Questions Copied from Book

Web Summary : Maharashtra's police recruitment faces scrutiny as 85 out of 100 questions allegedly mirrored a private publication. Congress leader Vijay Wadettiwar criticizes the government, alleging a betrayal of aspiring candidates and demanding accountability for the compromised examination process.