कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:25 IST2026-05-05T15:19:02+5:302026-05-05T15:25:02+5:30

Next CM of West Bengal 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री पदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा. फॅशन डिझायनर ते राजकारणी अशा त्यांच्या प्रवासावर एक नजर.

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर भाजपने आता मुख्यमंत्री निवडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सुवेंदू अधिकारी, दिलीप घोष आणि समीक भट्टाचार्य यांसारख्या अनुभवी नेत्यांसोबतच अग्निमित्रा पॉल यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अत्यंत प्रबळ मानले जात आहे. महिला सक्षमीकरण आणि पक्षातील वाढती लोकप्रियता ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे.

जन्म आणि शिक्षण: २५ नोव्हेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या अग्निमित्रा पॉल या डॉ. अशोक रॉय यांच्या कन्या आहेत. त्यांनी वनस्पतीशास्त्रात (Botany) पदवी घेतल्यानंतर फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

राजकारणात येण्यापूर्वी त्या कोलकाता येथील एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. त्यांचा 'इंगा' (Inga) हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय होता.

त्यांनी श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, के.के. मेनन यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसाठी कपडे डिझाइन केले आहेत. 'कोई मेरे दिल से पूछे' आणि 'वाया दार्जिलिंग' या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनाही शॉल आणि ब्लँकेट भेट दिले होते.

अग्निमित्रा पॉल यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच त्यांनी पक्षात आपले स्थान निर्माण केले.

महिला मोर्चा: भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी 'सेल्फ डिफेन्स' वर्कशॉप आयोजित करून मोठी पकड निर्माण केली.

२०२१ मध्ये त्यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून तृणमूलच्या सायोनी घोष यांचा पराभव केला होता. २०२६ च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे.

जानेवारी २०२६ मध्ये त्यांची पश्चिम बंगाल भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

भाजपने बंगालमध्ये 'महिला व्होट बँक' मोठ्या प्रमाणावर आकर्षित केली आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जींसारख्या खंबीर महिला नेत्याला पर्याय म्हणून अग्निमित्रा पॉल यांच्यासारखा सुशिक्षित, आधुनिक आणि आक्रमक महिला चेहरा देणे भाजपला राजकीयदृष्ट्या फायदेशीर वाटू शकते. जरी रूपा गांगुली किंवा सुवेंदू अधिकारी यांची नावे चर्चेत असली, तरी अग्निमित्रा पॉल यांचा 'क्लिन इमेज' आणि सक्षमीकरणाचा अजेंडा त्यांना इतरांपेक्षा पुढे नेणारा ठरत आहे.