UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:00 IST2026-05-05T15:58:14+5:302026-05-05T16:00:02+5:30
संयुक्त राष्ट्राच्या पुढील महासचिव पदासाठी आता हालचाली वेगवान झाल्या असून, या शर्यतीत दोन महिला उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
संयुक्त राष्ट्राच्या ८० वर्षांच्या इतिहासात जे कधी घडले नाही, ते आता घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या पुढील महासचिव पदासाठी आता हालचाली वेगवान झाल्या असून, या शर्यतीत दोन महिला उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे, चीनने यावेळेस महिला उमेदवाराला उघडपणे पाठिंबा दर्शवला असून, "एखादी महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाली तर आम्हाला मनापासून आनंद होईल," असे विधान चीनने केले आहे.
८० वर्षांचा इतिहास बदलणार?
संयुक्त राष्ट्राचे विद्यमान महासचिव एंतोनियो गुतारेस यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. त्यांच्या जागी नवा चेहरा निवडण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. संयुक्त राष्ट्रात चीनचे स्थायी प्रतिनिधी राजदूत फू कोंग यांनी सोमवारी (४ मे २०२६) माध्यमांशी संवाद साधताना मोठे संकेत दिले. ते म्हणाले की, "गेल्या ८० वर्षांत एकदाही महिला महासचिव झालेली नाही. जर यावेळेस हे घडले, तर चीन त्याचे स्वागतच करेल."
शर्यतीत कोण आहे?
सध्या या प्रतिष्ठेच्या पदासाठी चार प्रमुख नावे चर्चेत आहेत:
१. मिशेल बेशेलेट: संयुक्त राष्ट्राच्या माजी मानवाधिकार उच्चायुक्त.
२. रेबेका ग्रिन्सपान: संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेच्या (UNCTAD) महासचिव.
३. राफेल ग्रोसी: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख.
४. मैकी सॉल: सेनेगलचे माजी राष्ट्राध्यक्ष.
या चौघांनीही सदस्य देशांसमोर आपले व्हिजन मांडले असून, येत्या काही आठवड्यांत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.
चीनची नेमकी भूमिका काय?
जेव्हा फू कोंग यांना चीनच्या पसंतीच्या उमेदवाराबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिले, "माझ्या मनात एखादे नाव असले तरी मी ते आता सांगणार नाही." मात्र, चीनला कसा महासचिव हवा आहे, यावर त्यांनी भाष्य केले. "आज जग एका नाजूक वळणावर आहे. अशा वेळी आम्हाला असा खंबीर नेता हवा आहे जो बहुपक्षीयवादाचा पुरस्कर्ता असेल आणि केवळ एखाद्या महासत्तेच्या तालावर नाचणार नाही," असे कोंग यांनी स्पष्टपणे सांगितले.
निवड प्रक्रिया कशी चालते?
संयुक्त राष्ट्राच्या १९३ सदस्य देशांची महासभा ही सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार महासचिवांची निवड करते. मात्र, यात खरी ताकद सुरक्षा परिषदेच्या ५ स्थायी सदस्यांकडे (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) असते. या देशांकडे 'व्हीटो' अधिकार असल्याने त्यांच्या संमतीशिवाय कोणीही या पदावर बसू शकत नाही. चीनने मे महिन्यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले असून, जून-जुलैपर्यंत निवड प्रक्रियेला वेग येईल, अशी चिन्हे आहेत.