हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर

Hardik Pandya absence in Mumbai Indians IPL 2026: हार्दिक पांड्या मैदानात किंवा स्टेडियममध्येही दिसला नाही

पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात खूपच खराब कामगिरी करत आहे. मुंबईच्या संघाने १० पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते गुणतालिकेत तळाशी आहेत.

९ पैकी केवळ २ सामने जिंकले असताना, सोमवारी मुंबईचा सामना गुणतालिकेत तळाशी असलेल्या लखनौ सुपरजायंट्सशी झाला. या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी करत विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सच्या विजयापेक्षाही या सामन्यात चर्चा रंगली ती रोहित शर्माच्या पुनरागमनाची आणि त्यापेक्षाही अधिक चर्चा झाली ती हार्दिक पांड्याच्या संघातील व मैदानावरील अनुपस्थितीची.

मैदानात सामन्याआधी अचानक सूर्यकुमार यादव नाणेफेकीसाठी आला. हार्दिक पांड्याची तब्येत ठीक नसल्याने तो खेळणार नाही, असे त्याने सांगितले. पण हार्दिकच्या अनुपस्थितीचे खरे कारण आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्सने दोनशेहून जास्त धावांचे आव्हान सहज पेलले. रायन रिकल्टनच्या ८३ धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दमदार विजय मिळवला. त्यानंतर रिकल्टनने खरं कारण सांगितले.

सामनावीर म्हणून सन्मानित झालेला रिकल्टन म्हणाला, "हार्दिक पांड्याच्या दुखापतीची मला दुपारपर्यंत काहीच कल्पना नव्हती. मला अचानक सामन्याच्या काही तास आधी याबाबत कळले."

"हार्दिक पांड्या कधी संघात परतेल याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. हार्दिकचे पाठीचे दुखणे बळावले आहे. हे दुखणे किती गंभीर आहे आणि सावरायला किती वेळ लागेल मला माहिती नाही."

"सध्या त्याची स्थिती कशी आहे याची कल्पना नाही, पण इथून रायपूरला पुढील सामन्यासाठी निघताना तो नक्कीच आमच्यासोबत असेल अशी आशा आहे," असे रिकल्टन पत्रकार परिषदेत म्हणाला.