सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:42 IST2026-05-05T13:41:16+5:302026-05-05T13:42:46+5:30
National Lok Adalat May 2026: राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तुमचे प्रलंबित वाहतूक चलन निकाली काढा.

सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
तुमच्या गाडीवर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचे चलन प्रलंबित आहे का? जर असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ९ मे २०२६ रोजी देशभरात 'राष्ट्रीय लोक अदालत' भरवण्यात येणार आहे. यामध्ये तुम्ही तुमचे जुने ट्रॅफिक चलन्स अत्यंत कमी दंड भरून किंवा सामोपचाराने निकाली काढू शकता.
वाचकांसाठी ही आनंदाची बाब आहे की, या लोक अदालतीमध्ये तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी सहभाग घेऊ शकता. ज्यांना प्रत्यक्ष न्यायालयात जाणे शक्य नाही, ते 'व्हर्च्युअल लोक अदालत'च्या माध्यमातून आपले प्रकरण मिटवू शकतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे.
लोक अदालतीचा फायदा काय?
अनेकदा लोक अदालतीमध्ये दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात कमी केली जाते. प्रलंबित चलन न्यायालयात गेल्यावर होणारा मनस्ताप आणि फेऱ्या यातून तुमची कायमची सुटका होते. लोक अदालतीमध्ये घेतलेला निर्णय हा अंतिम असतो आणि त्याविरोधात पुन्हा अपील करता येत नाही, ज्यामुळे प्रकरणाचा तात्काळ निकाल लागतो.
कशी करावी नोंदणी?
ज्या नागरिकांना आपले चलन लोक अदालतीमध्ये ठेवायचे आहे, त्यांना आधी ई-चलन पोर्टलवर जाऊन आपल्या प्रकरणाची स्थिती तपासावी लागेल. त्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क साधून किंवा ऑनलाइन पोर्टलवर टोकन घेऊन नोंदणी करता येईल.