सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:40 IST2026-05-05T15:38:36+5:302026-05-05T15:40:58+5:30
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोनं सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

फोटो - आजतक
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोनं सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं आहे. भाजपा नेत्यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्यांवर संपत्ती लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलीस तपास सुरू आहे.
माथेरदिघी ग्रामीण रुग्णालयात ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एक संशयास्पद बॅग आढळून आली. रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक लोकांना संशय आल्याने त्यांनी ती बॅग उघडली. बॅग उघडताच सर्वांचे डोळे विस्फारले. कारण त्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि जमिनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे होती.
रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी, जिथे रुग्णांवर उपचार होतात, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळणं धक्कादायक आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, हे प्रकरण साधं नसून यात मोठ्या घोटाळ्याची शक्यता आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
भाजपाचे टीएमसीवर गंभीर आरोप
या प्रकरणावरून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही संपत्ती टीएमसीच्या एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आमदार शौकत मोल्ला यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हुसेन गाझी यांनी ही संपत्ती रुग्णालयात लपवून ठेवली होती, असा आरोप भाजपाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत निदर्शनं केली आणि प्रभारी डॉक्टरांना जाब विचारला.
पोलीस तपास आणि डॉक्टरांचा दावा
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली. याच दरम्यान रुग्णालयाचे डॉक्टर शाहरुख खान यांनी भाजपाचे आरोप फेटाळत वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही बॅग समसेर मीर नावाच्या तरुणाची आहे, जो स्थानिक टीएमसी बूथ अध्यक्षाचा मुलगा आहे. समसेर हा रुग्णालयात तात्पुरता कर्मचारी म्हणून काम करतो. त्याने ही बॅग तिथे का ठेवली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून, भ्रष्टाचाराची अनेक मोठी नावं समोर येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, टीएमसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या पोलीस जप्त केलेली रक्कम, सोनं आणि जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत.