वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:11 IST2026-05-05T15:11:11+5:302026-05-05T15:11:31+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची एक टाकी वादळात उडून नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे.

वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची एक टाकी वादळात उडून नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा ठेका घेतलेल्या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे कर्मचारी टाकीच्या वरच्या भागात झिंक अॅलम मटेरियलची बोल्टिंग करत होते. तेवढ्यात अचानक आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे बांधकाम सुरू असलेला टॉप रूफ तुटून उडाला आणि अधांतरी अडकला. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे कामगार आधीच खाली उतरले होते. त्यामुळे या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग कंपनीद्वारे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या या टाकीच्या बांधकामाचा एकूण खर्च हा ३२ लाख ४१ हजार रुपये एवढा असल्याचे सांगण्यात येत आहे. दीड लाख लीटर एवढी साठवण क्षमता असलेली ही टाकी निर्माणाधिन अवस्थेत असतानाच वेगवान वाऱ्यामुळे तिचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.
दरम्यान, या कंपनीला जिल्ह्यामधील सुमारे १५० पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाचा ठेका मिळालेला आहे. स्थानिकांनी जेव्हा पाण्याच्या टाकीचा वरचा भाग कोसळताना पाहिले तेव्हा गावात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र कामगारांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.