पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 23:43 IST2026-05-05T23:42:57+5:302026-05-05T23:43:50+5:30
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, रात्री उशीरापर्यंत घटनेचा तपास सुरू होता.

पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : चाकण आणि नसरापूरची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर आजोबांनीच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.५) पर्वती परिसरात घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना कळल्यानंतर जमावाने रस्ता रोको करून संताप व्यक्त केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, रात्री उशीरापर्यंत घटनेचा तपास सुरू होता. नागरिकांचे पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु होते.
आरोपी हा अल्पवयीन मुलीचा आजोबा असून, पीडित मुलगी आरोपीच्या मुलीची मुलगी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मंगळवारी आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर तेथील महिलांना संशय आल्याने त्या दरवाजा उघडून खोलीत गेल्या. तेव्हा मुलीचे कपडे काढल्याचे दिसले. नागरिकांनी आरोपीला चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र परिसरात तणावाचे वातावारण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका ५४ वर्षीय नराधम आजोबाने आपल्या अवघ्या ३ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यांनतर नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण घडले. चाकण मध्येही तीन वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला. या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा पुण्यात आजोबाच्या विकृत कृत्याने संतापाची लाट उसळली आहे.