“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 22:20 IST2026-05-05T22:17:52+5:302026-05-05T22:20:26+5:30
BMC Mayor Ritu Tawade News: आपण आता महापौर नाही, विरोधी पक्ष नेत्या आहोत हे किशोरी पेडणेकर वारंवार विसरतात, अशी टीका करण्यात आली.

“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
BMC Mayor Ritu Tawade News:किशोरी पेडणेकर यांच्या पचनीच पडत नाही की, ते आता सत्तेत नाही. त्यामुळे त्या उठसूट त्या खुर्चीकडे धावतात. ही अवस्था त्यांची झालेली आहे. ते आता खूप अस्वस्थ झालेले आहेत. मला जरा उशीर झाला की, त्या खुर्चीकडे पळतात. त्यांनी आता मनाची मानसिकता तयार करायला हवी की, ही खुर्ची आता माझ्यापासून लांब गेलेली आहे. आता आम्ही विरोधात बसलेलो आहोत. हे कळेल, तेव्हा खुर्चीकडे धावण्याचे काम बंद करतील, अशी खोचक टीका मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली.
मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौरांच्या खुर्चीवरून नाट्य रंगले होते. पालिका सभागृहाची वेळ होऊनही सभागृहात भाजपा नगरसेवक वगळता बाकी सर्व पक्षांचे नगरसेवक आले होते. बराचवेळ झाला तरी सभागृहाचे कामकाज सुरू झाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सभागृहाची गणसंख्या पूर्ण झाल्यामुळे सभागृह सुरू करण्याची मागणी केली. पीठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांना खुर्चीत बसवण्याची मागणी पेडणेकर यांनी केली. ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी अनुमोदन दिले. किशोरी पेडणेकर या व्यासपीठावर चढल्या आणि महापौरांच्या खुर्चीच्या दिशेने गेल्या. महापौरांच्या आसनावर त्या बसणार इतक्यात भाजपाचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले आणि भाजपाची लाज वाचली. यावरून पत्रकारांशी बोलताना रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली.
पश्चिम बंगालची जनता ममतादीदींच्या दादागिरीला कंटाळली
पश्चिम बंगालच्या निकालावर बोलताना रितू तावडे म्हणाल्या की, हा निकाल आमच्या पक्षासाठी ऐतिहासिक आहे. पश्चिम बंगालची जनता ममतादीदींच्या दादागिरीला, अहंकारी, हेकेखोर स्वभावाला कंटाळली आहे. ज्या पद्धतीने पश्चिम बंगालच्या जनतेला त्रास होत होता, तो उद्वेग मतांच्या माध्यमातून त्यांनी दाखवला आहे. २०६ जागा आलेल्या आहेत, याचाच अर्थ लोकांचा विरोध त्या सरकारला किती होता, हे दिसून येते. तो विरोध लोकांनी मतपेटीतून दाखवला आहे. लोक त्यांच्या त्रासाला कंटाळली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांना अनेकदा मारहाण केली जायची.
ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी
सत्ता गेली, पराभव झाला, हे ममता बॅनर्जी यांना पचनी पडत नाही. इथे किशोरी पेडणेकर यांचीही तीच अवस्था आहे. ममता बॅनर्जी आणि किशोरी पेडणेकर दिसायलाही बहिणी-बहिणी दिसतात. स्वभावही त्या दोघींचा तसाच आहे. त्यामुळेच लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, या शब्दांत रितू तावडे यांनी निशाणा साधला. पश्चिम बंगाल निवडणूकीतील निकालाचाच धागा पकडत महापौर रितू तावडे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी करत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, आपण आता महापौर नाही, विरोधी पक्ष नेत्या आहोत हे किशोरी पेडणेकर वारंवार विसरतात. तीन राज्यात भाजपाला जे यश मिळाले त्याचा विजय आम्ही साजरा करत होतो म्हणून सभागृहात यायला उशीर झाला. त्याचवेळी पेडणेकर यांनी खुर्चीत बसण्याचा प्रयत्न केला. महापौर पदाचीच त्यांना इर्षा आहे त्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचा टोला रितू तावडे यांनी लगावला.