“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 20:11 IST2026-05-05T20:11:36+5:302026-05-05T20:11:36+5:30
AIMIM Asaduddin Owaisi On West Bengal Election 2026 Result: AIMIMने पश्चिम बंगालमध्ये ११ ठिकाणी उमेदवार उभे केले होते, हे सर्व पराभूत झाले.

“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
AIMIM Asaduddin Owaisi On West Bengal Election 2026 Result: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाबाबत संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. AIMIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही यावर भाष्य केले.
AIMIMने पश्चिम बंगालमध्ये ११ ठिकाणी उमेदवार उभे केले होते, परंतु ते सर्व पराभूत झाले. यावर ओवेसी यांनी पक्षाला मतदान करणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. तसेच आम आदमी पक्ष, उद्धवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांनी यापूर्वी सॉफ्ट हिंदुत्वाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत ओवेसी यांनी मुस्लिम समाजाला आवाहन करताना सांगितले की, आपले स्वतंत्र राजकीय नेतृत्व तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा
पश्चिम बंगाल राज्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे आणि या जनादेशाचा आदर केला पाहिजे. हा जनतेचा निर्णय आहे, तो आपल्याला स्वीकारावा लागेल. मी यापूर्वीही म्हटले आहे की, तथाकथित 'धर्मनिरपेक्ष पक्ष' भाजपाचा विस्तार रोखू शकणार नाहीत, असे ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मी राजीनामा देण्यासाठी लोकभवनात जाणार नाही. आम्ही पक्षाच्या सदस्यांसोबत आमच्या पुढील रणनीतीवर चर्चा करू. मी भाजपाचे अत्याचार यापुढे सहन करणार नाही. मी पुन्हा रस्त्यावर उतरेन. आम्ही निवडणूक हरलेलो नाही, आमचा पराभव करण्यात आला आहे. आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे. SIR मधून ९० लाख मते काढून टाकण्यात आली. भाजपाने १०० जागा चोरल्या आहेत. इंडिया आघाडी एकजूट आहे आणि माझ्यासोबत आहे, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.