टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर बॅटर संजू सॅमसनचेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून यंदाच्या हंगामात धमाक्यावर धमाका करताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तो आणखी एका शतकाच्या जवळ पोहचला होता. धावा कमी असल्यामुळे त्याची शतकी संधी हुकली. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाबाद ८७ धावा करत त्याने खास 'द्विशतकी' डाव साधला. आयपीएलच्या एका हंगामात एका फ्रँचायझी संघा विरुद्धच्या दोन सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करणारा तो विराट कोहली आणि लोकेश राहुल या दिग्गजानंतर तिसरा फलंदाज ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१९ वर्षांच्या इतिहासात फक्त तिघांनीच साधलाय 'द्विशतकी' डाव
यंदाच्या हंगामात संजू सॅमसन याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या चेन्नईच्या मैदानातील पहिल्या सामन्यात ५६ चेंडूत नाबाद ११५ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर आता ८७ धावासह त्याने या संघाविरुद्ध एका हंगामात २०२ धावा केल्या. आयपीएलच्या आतापर्यंतच्या १९ वर्षांच्या इतिहासात विराट कोहली, केएल राहुल आणि संजू सॅमसन या तिघांनीच एका हंगामात एका फ्रँचायझी संघाविरुद्ध दोन सामन्यात २०० धावांचा आकडा गाठला आहे.
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
विराट कोहलीसह KL राहुलच्या नावे खास विक्रम
हंगामात एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकवण्याचा खास विक्रम हा विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या नावे आहे. विराट कोहलीनं २०१६ च्या हंगामात गुजरात लायन्स संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद शतक आणि दुसऱ्या सामन्यात १०९ धावांच्या खेळीसह २०९ धावा केल्या होत्या. लोकेश राहुलनं २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेल्या दोन सामन्यात प्रत्येकी १०३, १०३ धावांची नाबाद खेळी साकारली होती. या दोघांप्रमाणे संजूलाही दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एका हंगामात दोन शतके झळकवण्याचा डाव साधण्याच्या संजू अगदी जवळ होता. पण अल्प धावांचा पाठलाग करत असल्यामुळे ते साध्य झालं नाही.