Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:48 IST2026-04-23T19:40:49+5:302026-04-23T19:48:28+5:30
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी सौंदर्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडलाही मागे टाकतील. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही खालील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

काश्मीरमधील पहलगामची 'बैसरन' घाटी हे एकेकाळी पर्यटकांचे सर्वात लाडके आणि ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण होते. मात्र, एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर या परिसरातील पर्यटकांची वर्दळ प्रचंड रोडावली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या अनेक पर्यटक पहलगामपासून दूर राहणे पसंत करत आहेत.

पण, निसर्गप्रेमींची निराशा करण्याची गरज नाही, कारण भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी सौंदर्याच्या बाबतीत स्वित्झर्लंडलाही मागे टाकतील. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही खालील ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.

मुनस्यारी (उत्तराखंड) : पिथौरागढ जिल्ह्यात असलेले मुनस्यारी हे अतिशय सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. याला 'हिमनगरी' किंवा 'छोटा काश्मीर' असेही म्हणतात. येथे पर्यटकांची गर्दी कमी असल्याने, शांततेत निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथले डोंगर आणि तिथून दिसणारे निसर्गाचे दृश्य कोणत्याही स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाही.

गुलमर्ग (जम्मू-काश्मीर) : 'फुलांची दरी' म्हणून ओळखले जाणारे गुलमर्ग हे काश्मीरचे एक नंदनवन आहे. इथेही बैसरनप्रमाणेच हिरवेगार मैदान आणि चारही बाजूंनी बर्फाळ डोंगर आहेत. गोंडोला राईड (केबल कार) आणि स्नो स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. निसर्गाचे अद्भुत दर्शन घडवणारे हे ठिकाण पुन्हा एकदा पर्यटकांना साद घालत आहे.

औली (उत्तराखंड) : जर तुम्हाला बर्फाच्छादित डोंगररांगा आणि निसर्गाची भव्यता अनुभवायची असेल, तर उत्तराखंडमधील औलीला नक्की पसंती द्या. नंदा देवीच्या पर्वतांच्या सानिध्यात असलेले औली हे स्कीइंगसाठी जगप्रसिद्ध आहे. इथे तुम्ही केबल कारचा (रोप-वे) आनंद घेऊ शकता किंवा शांतपणे निसर्गाच्या कुशीत वेळ घालवू शकता.

खज्जियार (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात वसलेले खज्जियार हे खऱ्या अर्थाने 'मिनी स्वित्झर्लंड' आहे. विशाल देवदार वृक्षांनी वेढलेले हे ठिकाण आणि मधोमध असलेली एक छोटीशी निसर्गरम्य झील, पर्यटकांना भुरळ घालते. येथील हिरवळ आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करते.

















