स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? चकीत केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 16:54 IST2026-04-23T16:46:16+5:302026-04-23T16:54:02+5:30
Skoda Kushaq Facelift 2026 Review in Marathi : Skoda Kushaq Facelift मध्ये काय बदलले आहे? नवीन ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ३६०-डिग्री कॅमेरा. स्कोडाच्या या नव्या एसयूव्हीचा परफॉर्मन्स आणि किंमत याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट वाचा.

- हेमंत बावकर
स्कोडा म्हटले की डोळ्यासमोर येते ती एक प्रिमिअम कार. थोड्या महाग म्हटल्या जायच्या. परंतू, स्कोडाने एक छोटी कार कायलॅक बाजारात आणून आपली उपस्थिती रस्त्यावर दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. पण या कारपूर्वी स्कोडाची मिड-साईज एसयूव्ही 'कुशाक'ने दणकटपणा, मायलेज आणि प्रिमिअमनेस हे काय असते हे भारतीयांना दाखविले होते. नुकतेच या कारचे फेसलिफ्ट आले आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी स्कोडा कुशाकचा रिव्हू केला होता. अगदी त्याच घाटात नवीन रस्त्यांवर आम्ही ही नवी एसयुव्ही सुमारे ४०० किमी चालविली. आम्हाला काय काय बदललेले वाटले... एक म्हणजे मायलेज, तंत्रज्ञान आणि चला पाहुया...

कुशाकचे मूळ डिझाइन आधीच यूरोपियन आणि क्लासी होते. फेसलिफ्टमध्ये ते अधिक चांगले करण्यात आले आहे. नवीन एलईडी हेडलॅम्प्समध्ये आता क्रिस्टलाईन डिझाइन देण्यात आले आहे. पुढचा आणि मागचा बंपर पुन्हा डिझाइन करण्यात आला असून, त्याला अधिक मस्कुलर लूक दिला आहे. नवीन १७-इंच अलॉय व्हील्स गाडीला स्पोर्टी टच देतात. मागच्या बाजूला सी-शेप एलईडी टेल लॅम्प्समध्ये आता डायनॅमिक इंडिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे.

अंतर्गत सजावट आणि फीचर्स
स्कोडाने डॅशबोर्डवर आता सॉफ्ट-टच लेदर इन्सर्ट्सचा वापर केला आहे, ज्यामुळे केबिन अधिक प्रीमियम वाटते. १०-इंचची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. ड्रायव्हरसाठी ८-इंचचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आले आहे. पॅनोरॅमिक सनरूफ, आणि ३६०-डिग्री पार्किंग कॅमेरा यांसारख्या आधुनिक फीचर्सचा भरणा यात करण्यात आला आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स
आम्ही जो घाट म्हणत होतो तो मांढरदेवीचा घाट होता. गेल्यावेळी आम्ही पावसाळ्यात कुशाक घेऊन गेलो होतो. यावेळी कडाक्याच्या उन्हाळ्यात. पुण्याकडील बाजुने रस्ता अर्धा सिमेंटचा झालेला आणि पुढे सगळा दगड गोट्यांचा खेळ. पेट्रोलच्या बऱ्याच गाड्या तिथे कच खात होत्या. कोणाच्या थांबत होत्या, कोणाच्या कारचे टायर या दगडगोट्यांवर गरागरा फिरत होते. स्कोडाने इथेच सगळा गेम फिरविला होता. छानपैकी ग्रिप पकडत ताकदीने कुशाक त्या रस्त्यावरून जात होती.

सस्पेंशन...
ओबडधोबड दगड देखील होते, पिकअप जास्त असल्याने आम्ही त्यावरून गाडी वेगाने घेऊन जात होतो, आतमध्ये फारकाही जाणवत नव्हते. बाहेरील आवाजदेखील बऱ्यापैकी कमी करण्यात आला आहे. टायरखालून दगड जाताना जो आवाज येतो तो सोडता दाण-दाण असे आवाज कुठेच जाणवले नाहीत. एवढा केबिन नॉईस कमी करण्यात आला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मायलेज...
मायलेज तर टेस्ट करणारच ना, भारतीय जे आहोत. आम्ही जी चालविली ती स्कोडा कुशाक माँटे कार्लो एडिशन होती, ८ स्पीड अॅटोमॅटीक गिअरबॉक्स असलेली. शहरात १०-१२ चे मायलेज कारने दिले. पिकअपचा तर प्रश्नच आला नाही. हायवेवर कारने पार अगदी १९-२१ चे मायलेज देत ८ स्पीडची खरी गंमत दाखवून दिली. असे नाही की आम्ही गाडी पळविली. पुणे-कोल्हापूर हायवेचा ८० किमीचा नियम पाळत आम्ही गाडी ७०-७५ च्या वेगाने चालवत होतो. रस्ता बराचसा मोकळा असल्याने क्रूझ कंट्रोलही काही काळ ७५ वर सेट केला होता. पुढे चढ उतार, डोंगररांगा यात १४-१५ पर्यंत मायलेज आले होते. महत्वाचे म्हणजे ७० च्या स्पीडनंतर सातवा, आठवा गिअर चालत होता.

उन्हाळा तर किती रे तो...
साधारण ११ वाजण्याच्या सुमारास काळुबाईच्या डोंगरावर आम्ही पोहोचलो. उन्हाने चटके देण्यास सुरुवात केली होती. एकच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली तेव्हा बाहेर भाजत होते. भलामोठा सनरुफ होता, उकाडा जाणवू लागला होता. पुढे व्हेंटिलेटेड सीट असल्याने कारमध्ये बसताना चटका जाणवला नाही, परंतू विंडशिल्डमधून उन बऱ्यापैकी डोकावत होते. हल्ली सनरुफची जास्त क्रेझ आहे, कंपन्या या सनरुफला आतून झाकण्यासाठी पातळ कापड देतात. त्यामुळे पार अगदी डोके देखील तापू लागते. स्कोडामधील हे कापड थोडे जाड आहे, यामुळे उकाडा जाणवत नव्हता. पाठीमागील प्रवाशांसाठी एसी देण्यात आला आहे. यामुळे पाठीमागे देखील चांगल्या पद्धतीने कुलिंग होत होते. थोडा वेळ लागत होता, परंतू ५-७ मिनिटांत पाठीमागील रोमध्ये देखील थंडावा जाणवत होता.

रात्रीचा प्रवास...
पुढे आम्ही खंडाळामार्गे फलटण आणि नंतर पुन्हा पुण्याकडे रवाना झालो. बहुतांश कार उन्हातच चालविली. रात्रीच्या वेळी साधारण चाळीस एक किमी चालविली. लाईटचा थ्रो रस्त्यावर चांगली व्हिजिबिलिटी देतो. हेडलाईट लेव्हल सेट करता येत असल्याने लाईटचा थ्रो समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात पडत नाही. ही त्यांची पण आणि आपली पण सुरक्षाच म्हणायला हवी. टर्निंगला उजव्या, डाव्या बाजुला लाईट स्प्रेड होते यामुळे व्हिजिबिलीटी वाढते. यामुळे एखाद्या दगडाला किंवा बाजुला काही दिसत नसेल तर गाडी घासण्याची शक्यता फार कमी होते.

















