बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:04 IST2026-04-23T20:03:55+5:302026-04-23T20:04:32+5:30

Tamil Nadu And West Bengal Election : पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदानाची विक्रमी टक्केवारी!

Record voting percentage in Bengal-Tamil Nadu; Whose fortune will shine with the bumper voting? | बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?

बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?

देशातील दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आज लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. दोन्ही राज्यांत मतदारांनी घराबाहेर पडून बंपर मतदान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मतदानाची ही विक्रमी टक्केवारी पाहता, सत्ताधारी पुन्हा बाजी मारणार की विरोधक सत्तेचे समीकरण बदलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तमिळनाडूत तिरंगी लढत, मतदारांचा उत्साह

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात मतदान पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ८२.२४ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. या निवडणुकीत सत्ताधारी द्रमुक, भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आणि अभिनेता विजय यांचा नवाकोरा पक्ष ‘टीव्हीके’ यांच्यात जोरदार तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी कोणाच्या पारड्यात झुकणार, हे ४ मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये जंगलमहाल ते उत्तर बंगालपर्यंत रांगा

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहून सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल ८९.९३ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. आज राज्यातील १६ जिल्ह्यांतील १५२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. उत्तर बंगाल, दक्षिण बंगाल आणि विशेषतः ‘जंगलमहाल’ क्षेत्रातील मतदारांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली होती.

मुर्शिदाबादपासून ते बांकुरापर्यंतच्या अनेक संवेदनशील भागांत अत्यंत सुरक्षित वातावरणात मतदान झाले. पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत असून, १४२ जागांसाठीचा दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. आजच्या मतदानानंतर उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. वाढलेली ही मतदानाची टक्केवारी ही सत्तापालटाचे संकेत आहेत की सत्ताधाऱ्यांवरील विश्वासाची पावती, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title : बंगाल, तमिलनाडु में रिकॉर्ड मतदान; किसको मिलेगा फायदा?

Web Summary : पश्चिम बंगाल और तमिलनाडु विधानसभा चुनावों में भारी मतदान हुआ। तमिलनाडु में त्रिकोणीय मुकाबला है, जबकि पश्चिम बंगाल में पहले चरण में प्रभावशाली आंकड़े दर्ज किए गए। 4 मई को नतीजे घोषित होंगे।

Web Title : Record Voting in Bengal, Tamil Nadu; Who Will Benefit?

Web Summary : West Bengal and Tamil Nadu witnessed high voter turnout in assembly elections. Tamil Nadu saw a three-way fight, while West Bengal's first phase recorded impressive numbers. Results on May 4th will reveal who wins.