पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 21:53 IST2026-04-23T21:52:26+5:302026-04-23T21:53:03+5:30
होमगार्डवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाकडून शिवीगाळ करत लाथ मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वेस्टर्न रेल्वे मजदूर संघटनेने अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात निषेध नोंदवत होमगार्ड शिपायावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी केवळ एनसी नोंदवल्याने पोलीसच शिपायाला माघारी घालत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या विलेपार्ले स्थानकात २१ एप्रिलच्या रात्री सुमारे ९.३० वाजता ही घटना घडली. ट्रेन मॅनेजर चैतन्य माळवदे यांच्या म्हणण्यानुसार माहीम, वांद्रे, आणि खार स्थानकादरम्यान तीन ते चार गार्ड महिला डब्यात चढल्याचे त्यांनी पहिले.यावेळी माळवदे यांनी होमगार्डला एकाच डब्यात न थांबता वेगवेगळ्या डब्यात थांबल्यास महिलांना चढण्यास आणि उतरण्यास मदत होईल अशा सूचना त्यांना दिल्या मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर माळवदे यांना होमगार्डच्या शिवीगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. माळवदे यांनी तक्रार करण्याचा इशारा देताच त्यापैकी एक असलेल्या मनोज सावंत या होमगार्डने त्यांना लाथ मारली.
घटनेनंतर २२ एप्रिल रोजी सुमारे २२ ते २३ ट्रेन मॅनेजर्स अंधेरी जीआरपी पोलीस ठाण्यात एकत्र जमले आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र (एनसी) गुन्हा नोंदवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “कर्तव्य बजावण्यास अडथळा आणणे यासारखी गंभीर कलमे लागू न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. दुसरीकडे, जीआरपी अधिकाऱ्यांनी कायदेशीर सल्ल्यानंतर आवश्यक ती अतिरिक्त कलमे लागू करण्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. या घटनेमुळे उपनगरी लोकलमधील सुरक्षितता, विशेषतः महिलांच्या डब्यांमधील नियमांचे पालन आणि अधिकाऱ्यांचा अधिकार याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.