जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 21:45 IST2026-04-23T21:45:04+5:302026-04-23T21:45:45+5:30
'अटलांटा'वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
सुनील पाटील
जळगाव : रस्ते डांबरीकरणाच्या कामात महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी आणि व्याजासह सुमारे ४१ कोटी ३४ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून 'अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.' विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत. या कारवाईसाठी शहर अभियंता योगेश बोरोले यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी महापालिकेत दिवसभर कागदपत्रांची झाडाझडती घेतली.
नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी गुरुवारी आपल्या पथकासह महापालिकेत धडक दिली. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे पथक महापालिकेत तळ ठोकून होते. नगररचना विभाग आणि शहर अभियंता कार्यालयातून तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण कागदपत्रे संकलित करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या ‘मॅरेथॉन’तपासामुळे महापालिका वर्तुळात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रभाग क्र. १५ चे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी या कंपनीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. १९९७ मध्ये तत्कालीन नगरपरिषदेने या कंपनीला रस्ते डांबरीकरणाचे कंत्राट दिले होते. मात्र, कंपनीने आपली क्षमता नसतानाही खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ॲडव्हान्सचा घोळ
कामासाठी दिलेली १० कोटी ३५ लाख रुपयांची 'मोबिलायझेशन ॲडव्हान्स' रक्कम प्रकल्पासाठी न वापरता इतरत्र वळवण्यात आल्याचा संशय आहे. मूळ थकबाकी ४ कोटी ७९ लाख रुपये होती. मात्र, गेल्या २४ वर्षांतील ९ टक्के चक्रवाढ व्याजासह ही रक्कम आता ४१ कोटी ३४ लाख ११ हजार ५६२ रुपयांवर पोहोचली आहे. काम पूर्ण न करता वारंवार मुदतवाढ घेऊन प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि स्पष्ट अभिप्राय तात्काळ पोलिसांना सादर करावा. अटलांटा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शहर अभियंत्यांना दिले आहेत.